धुळे जिल्ह्याचा चेहरा बदलेल अशी पथदर्शी कामे करण्याचा संकल्प : पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल – महासंवाद
धुळे, दिनांक 4 जानेवारी, 2025 (जिमाका वृत्त) : धुळे जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गामुळे उपलब्ध होणाऱ्या दळणवळणाच्या सुविधा, मध्य व पश्चिम रेल्वेला जोडणारे रेल्वे मार्ग, शैक्षणिक हब, औद्योगिक वसाहतीत उद्योगांसाठी जागा व त्यातून उपलब्ध होणाऱ्या रोजगाराच्या संधी, सिंचनाचे प्रकल्प यांना येत्या काळात अधिक गती देऊन सर्वांच्या सहकार्याने धुळे जिल्ह्याचा चेहरा बदलेल. अशी पथदर्शी कामे उभी करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नविन नियोजन सभागृहात राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री श्री. रावल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती धरतीताई देवरे, खासदार डॉ. शोभाताई बच्छाव, ॲड. गोवाल पाडवी, आमदार काशिराम पावरा, मंजुळाताई गावित, अनुपभैय्या अग्रवाल, राघवेंद्र पाटील, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, महापालिका आयुक्त अमिता दगडे पाटील, परिविक्षाधिन अधिकारी सर्वांनंद डी, उपवनसंरक्षक नितीनकुमार सिंग, अपर पोलीस अधिक्षक किशोर काळे, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
मंत्री श्री. रावल म्हणाले की, केंद्र व राज्य सरकारच्या सहाकार्याने धुळे जिल्ह्यास अधिक विकासाच्या दिशेने नेण्यासाठी अपूर्ण प्रकल्पांना गती देण्यात येणार आहे. यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या फ्लॅगशिप योजनांना गती देण्यासाठी जिल्हा प्रशासनासोबतच लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन विकास कामांना गती देण्याची गरज आहे. सुलवाडे जामफळ उपसा जलसिंचन योजना, मनमाड-धुळे-इंदौर रेल्वे मार्ग, प्रस्तावित बोरविहीर (धुळे) ते नरडाणा रेल्वे मार्गाचे कामे सुरु आहे. त्यासाठी जमिनी संपादित करण्यात आलेल्या जमिनधारकांना भूसंपादन अधिनियमानुसार मोबदला अदा करण्यात करण्यात यावा. प्रधानमंत्री आवास योजना, राष्ट्रीय महामार्गाच्या प्रस्तावित कामांना गती द्यावी. रेल्वे व राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी व राज्य शासनाच्या अधिकाऱ्यांनी आपआपसात समन्वय साधावा. स्थानिक लोकप्रतिनिधीसोबत विकासकामांविषयी वेळोवेळी चर्चा करावी. राष्ट्रीय महामार्गाची कामे करतांना ती दर्जेदार होतील याकडे लक्ष देण्याचे निर्देश त्यांनी दिले.
जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीत प्रोसेंसिंग युनिट उभारण्यासाठी प्रयत्न करावेत. सोयाबीन खरेदीसाठी येणाऱ्या नाफेडच्या खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांच्या मालाची गुणवत्ता तपासून मालाच्या दर्जानुसार दर द्यावा. शिरपूर तालुक्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन भरपाईसाठी प्रस्ताव सादर करावा. मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजना, प्रधानमंत्री सौर कुसूम योजनेच्या लाभार्थ्यांना मंजुर सौरपंप वितरीत करावे. शहरातील वीजचोरी होणाऱ्या ठिकाणी धडक कारवाई करावी. कामगार विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांना गती द्यावी. महिला व बाल विकास भवनाच्या इमारतीसाठी नविन जागेची निश्चिती करावी. येत्या काळात धुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विकास कामे करुन धुळे जिल्ह्याचे नाव देशपातळीवर पोहचण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मंत्री श्री.रावल यांनी सांगितले.
यावेळी खासदार डॉ.शोभाताई बच्छाव, आमदार काशिराम पावरा, आमदार मंजुळाताई गावित, आमदार अनुपभैय्या अग्रवाल, आमदार राघवेंद्र पाटील यांनी जिल्ह्यातील प्रश्न व अडचणी मंत्रीमहोदयांसमोर मांडल्या.
यावेळी मनमाड-इंन्दौर, बोरविहीर-नरडाणा रेल्वे भूसंपादन, सुलवाडे जामफळ उपसा सिंचन योजना, प्रधानमंत्री आवास योजना, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, पणन विभाग, राष्ट्रीय महामार्ग, औद्योगिक विकास महामंडळ, महावितरण आदी विभागांचा आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्ह्यात प्रत्येक विभागामार्फत सुरु असलेल्या विकास कामांची तसेच विभागाच्या प्रमुख योजनांची सद्यस्थितीची माहिती मंत्री महोदयांना जाणून घेतली.
११ रुग्णवाहिकांचे लोकार्पण
राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते आज जिल्हा परिषद, धुळे येथील आवारात 11 नविन रुग्णवाहिकांचे लोकार्पण संपन्न झाले. धुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्राना राज्यस्तरावरुन या 11 नविन रुग्णवाहिका प्राप्त झाल्या आहेत. त्या विखरण, आर्वी, धमाणे, निमगुळ, वालखेडा, बोरीस, कळंबीर, मालपुर, शिरसोला, कुसूंबा या प्राथमिक आरोग्य केंद्रास प्रत्येकी एक तर जिल्हा रुग्णालयास एक रुग्णवाहिका उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
यावेळी मंत्री रावल म्हणाले की, जिल्हा परिषदेमार्फत गेल्या 5 वर्षांच्या काळात खुप चांगले विकासाची कामे झाली आहे. राज्य शासनामार्फत उपलब्ध झालेल्या 11 रुग्णवाहिका या सामान्य माणुस तसेच गरीबातील गरीब माणसांना एका फोनवर रुग्णसेवेसाठी उपलब्ध करुन द्याव्यात. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून 36 कोटी रुपयांचे नविन 5 प्राथमिक आरोग्य केंद्र, 17 उप केंद्र उभारले आहेत. यामाध्यमातून जनतेसाठी आरोग्य सुविधा उपलब्ध करुन दिली जात आहे. येत्याकाळात आरोग्य केंन्द्रात पुरेशा डॉक्टारांची व्यवस्था, औषधसाठा उपलब्ध करुन देण्यात येईल. तसेच जिल्ह्यातील मेडिकल कॉलेजमध्ये शिकत असलेल्या विद्र्यार्थ्यांना जिल्ह्यातच सेवा देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या रुग्णवाहिका लोकार्पण सोहळ्यास जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती धरतीताई देवरे, खासदार डॉ.शोभाताई बच्छाव, ॲड.गोवाल पाडवी, आमदार काशिराम पावरा, मंजुळाताई गावित, अनुपभैय्या अग्रवाल, राघवेंद्र पाटील, माजी खासदार डॉ. सुभाष भामरे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती हर्षवर्धन दहिते, महिला व बाल कल्याण सभापती ज्योती बोरसे, शिक्षण व आरोग्य सभापती सोनिताई कदम, समाज कल्याण सभापती कैलास पावरा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन बोडके यांच्यासह जिल्हा परिषदेचे सदस्य तसेच अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
000000