धुळे जिल्ह्यात ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजने’च्या कोणत्याही लाभार्थ्याची चौकशी नाही – जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर – महासंवाद
धुळे, दि. ४ (जिमाका वृत्त) : ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजने’च्या कोणत्याही लाभार्थ्याची चौकशी अथवा पडताळणी करण्याचे अद्याप शासनाचे निर्देश नाही. त्यामुळे धुळे जिल्ह्यातील लाडकी बहीण योजनेच्या कोणत्याही लाभार्थ्यांची चौकशी करण्यात आलेली नाही अथवा त्यांचेवर कारवाई करण्यात आलेली नाही. अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिली.
धुळे जिल्हृ्यातील लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यीची रक्कम परत घेतल्याचे वृत्त प्रसार माध्यमाद्वारे प्रसारित होत असल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांनी माध्यमांशी बोलतांना म्हटले आहे की, धुळे जिल्ह्यातील नकाणे गावातील महिला भिकुबाई प्रकाश खैरणार यांनी ३० सप्टेंबर, २०२४ रोजी स्वत:हून अर्ज करुन जिल्हा प्रशासनास कळविले आहे की, माझ्या अर्जास माझ्या मुलाचे आधारकार्ड जोडले गेल्याने लाभाची रक्कम त्याच्या बँक खात्यावर जमा झाली आहे. त्यामुळे सदरची रक्कम मी स्वत:हून परत करीत आहे. त्यानुसार या महिलेने स्वत:हून परत केलेली रक्कम प्रशासनाने जमा करुन घेतली असल्याचे श्री. पापळकर यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर या योजनेबाबत कुणाचा अर्ज अथवा आक्षेप प्राप्त झाल्यास त्याबाबत शासन नियमानुसार चौकशी करुन निर्णय घेण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांनी म्हटले आहे.
000000