दुग्ध व्यवसायासाठी ‘सेंटर फॉर एक्सलन्स’ उभारण्यास सहकार्य करणार – मंत्री राधाकृष्ण विखे पाटील
मुंबई, दि. 22 : “दुग्ध व्यवसायात डेन्मार्क हा देश जगात अग्रेसर आहे. या देशाचे महाराष्ट्रातील पशुपालकांना मार्गदर्शन लाभले तर राज्यातील दुग्ध व्यवसायास सहाय्य होऊन शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यास मदतच होईल, त्यासाठी डेन्मार्क सरकारला सेंटर फॉर एक्सलन्स उभारण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल”, असे राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.
डेन्मार्कच्या शिष्टमंडळाने आज सकाळी डेन्मार्कचे भारतातील राजदूत फ्रेडी स्वेन यांच्या नेतृत्वाखाली मंत्री श्री. विखे पाटील यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पशुसंवर्धन विभागाचे प्रधान सचिव जे. पी. गुप्ता, ‘महानंदा’चे व्यवस्थापकीय संचालक एस. आर. शिपूरकर आदी उपस्थित होते.
मंत्री श्री. विखे पाटील यांनी सांगितले, “या केंद्रामुळे पशुपालकांसह शेतकऱ्यांना लाभ होईल. दूध देणाऱ्या गायींच्या जातीवर संशोधन होऊन दुग्ध व्यवसाय वृद्धीसाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे, जनावरांची देखभाल आणि दुग्ध व्यवस्थापन याविषयी शेतकऱ्यांना अद्ययावत ज्ञान मिळावे म्हणून तरुणांसह दुग्धोत्पादक शेतकऱ्यांना प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध होईल”, त्यादृष्टीने संबंधितांनी प्रकल्प अहवाल तयार करण्याच्या सूचना त्यांनी केल्या.
हिमाचल प्रदेशातील सेंटर फॉर एक्सलन्सच्या धर्तीवर हे केंद्र असेल. या केंद्राच्या माध्यमातून दुग्ध क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञान, अत्याधुनिक पद्धतीने करावयाचा दुग्ध व्यवसाय, जनावरांच्या जातींमधील सुधारणा, दुग्ध शास्त्रावर आधारित अभ्यासक्रम, प्रक्रिया उद्योग यासाठी केंद्रांच्या माध्यमातून कार्य केले जाणार आहे. या केंद्राच्या जागा निश्चितीसाठी डेन्मार्कचे शिष्टमंडळ लवकरच भेट देऊन पाहणी करणार आहे. याशिवाय बैठकीत हरित ऊर्जा, दुग्ध व्यवसायातील नवनवीन तंत्रज्ञान, रोजगाराच्या संधी, शिक्षण यावर चर्चा होऊन परस्पर सहकार्यावर चर्चा करण्यात आली. प्रधान सचिव श्री. गुप्ता यांनी महाराष्ट्रातील दुग्ध व्यवसाय याविषयी माहिती दिली.
०००००
गोपाळ साळुंखे/स.सं