कुक्कुटपालन व्यवसायासाठी राज्यस्तरीय समन्वय समिती गठित
मुंबई, दि. 22 : राज्यातील खासगी व्यावसायिक पद्धतीने कुक्कुटपालन करणारे शेतकरी आणि कुक्कुट व्यवसाय करणाऱ्या कंपन्या यांना कुक्कुटपालन करतांना येणाऱ्या अडचणींवर उपाययोजना करण्यासाठी महसूल व पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे -पाटील यांनी दिलेल्या निर्देशानुसार राज्यस्तरीय कुक्कुट समन्वय समिती गठित करण्यात आली आहे.
या राज्यस्तरीय कुक्कुट समन्वय समितीचे अध्यक्ष हे पशुसंवर्धन आयुक्त असून इतर सदस्यांमध्ये अतिरिक्त आयुक्त पशुसंवर्धन, सहआयुक्त पशुसंवर्धन, रोग अन्वेषण विभाग, पुणे, सहायक आयुक्त पशुसंवर्धन, मध्यवर्ती अंडी उबवणी केंद्र, पुणे, समन्वयक, राज्यस्तरीय बँकर्स समिती, पुणे, मांसल कुक्कुट व्यवसाय (Contract Farming) करणारे 3 शेतकरी, मांसल कुक्कुट व्यवसाय (Open Farming) करणारे 3 शेतकरी, कुक्कुट अंडी उत्पादन व्यवसाय करणारे 5 शेतकरी, खाजगी कुक्कुट व्यवसाय करणाऱ्या (पिल्ले व खाद्य कंपन्यांचे 5 प्रतिनिधी, एनईसीसी यांचे प्रतिनिधी यांचा समावेश असणार आहे. उप आयुक्त पशुसंवर्धन (पशुधन व कुक्कुट), पशुसंवर्धन आयुक्तालय, पुणे हे या समितीचे सदस्य सचिव असणार आहेत.
या समितीच्या दर 3 महिन्याला नियमितपणे बैठका घेण्यात याव्यात, या बैठकांमध्ये खासगी व्यावसायिक कुक्कुट पालन करताना शेतकरी तसेच कुक्कुट व्यवसाय करणाऱ्या विविध कंपन्यांना हा व्यवसाय करीत असताना येणाऱ्या अडी-अडचणींवर उपाययोजना करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात यावी, असे निर्देश मंत्री श्री. विखे -पाटील यांनी दिले आहेत. मंत्री श्री. विखे -पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संबंधित व्यवसायिकांसोबत विधानभवन, पुणे येथे नुकत्याच झालेल्या बैठकीत मांसल कुक्कुट पालन तसेच अंडी उत्पादन करणारे शेतकरी व विविध कुक्कुट व्यवसाय करणाऱ्या कंपन्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर तोडगा काढण्याच्या सूचना त्यांनी दिल्या होत्या. त्यानुसार ही समिती गठित करण्यात आली आहे.
0000