शिये – बावडा तपासणी नाक्यावर स्थिर सर्वेक्षण पथकाच्या कारवाईत १५ लाख ६१ हजार जप्त – महासंवाद
कोल्हापूर, दि. ०१ (जिमाका): विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अंतर्गत शिये- बावडा तपासणी नाक्यावर स्थिर सर्वेक्षण पथकाने (SST) दिनांक 31 ऑक्टोबर 2024 रोजी 2 हजार 533 वाहनांची तपासणी केली. यातील एमएच 46 बीएम 4297 पिकअप हे वाहन तपासले असता त्यात 15 लाख 61 हजार 857 रुपये इतकी रक्कम आढळून आली असून या रक्कमेबाबत संबंधितांकडे कोणतेही पुरावे आढळून न आल्याने ही रक्कम जप्त करण्यात आल्याची माहिती 276 कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार (करमणूक) सैपन नदाफ यांनी दिली आहे.
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी आदर्श आचारसंहिता लागू असून स्थिर पथकाकडून वाहनांची तपासणी करण्यात येत आहे.
दिनांक 31 ऑक्टोबर 2024 रोजी 276 कोल्हापूर उत्तर मतदार संघातील शिये-बावडा रस्ता, छत्रपती राजाराम कारखान्या समोरील तपासणी नाक्यावर स्थिर सर्वेक्षण पथक क्र. 2 चे पथक प्रमुख पोपट साधु वाडेकर व त्यांच्या पथकाने रेडिअंट कॅश मॅनेजमेंट सर्विस लि. पुणे या कंपनीच्या पिकअप वाहनाची तपासणी केली असता यामध्ये रक्कम आढळून आली. या रक्कमेबाबत संबधितांच्याकडे विचारणा केली असता त्यांच्याकडे कोणतेही पुरावे आढळून आले नसल्याने ही रक्कम जप्त करुन कोषागार कार्यालयात सिलंबद पेटीमध्ये ठेवण्यात आली आहे. हे प्रकरण पुढील तपासणीसाठी आयकर विभागाकडे पाठविण्यात आले असल्याचे त्यांनी कळविले आहे.
०००