मतदारांना सुविधा तर आचार संहितेचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करा – विशेष निवडणूक निरीक्षक राम मोहन मिश्रा यांचे निर्देश – महासंवाद
नागपूर, दि. 16 : विधानसभा निवडणुकीसाठी मतदारांना विनासायास मतदान करता यावे, त्यांच्यातही उत्साह वृद्धींगत व्हावा यासह पुरेशा सुरक्षित वातावरणासह अधिक सुरक्षिततेला प्राधान्य देण्यासाठी तत्पर राहा. याचबरोबर कुठे जर शांतता भंग करण्याचा अथवा आचारसंहितेचे उल्लंघन करून कोणी जर वातावरण कलुषित करण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्याविरुद्ध तत्काळ कठोर कारवाई करण्याचे निर्देश विशेष निवडणूक निरीक्षक राम मोहन मिश्रा यांनी दिले.
जिल्ह्यात 20 नोव्हेंबर रोजी होणा-या मतदानाच्या पूर्वतयारीबाबत विशेष निवडणूक निरीक्षक राम मोहन मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. मेट्रो भवन येथे आयोजित या बैठकीस पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, निवडणूक निरीक्षक के. वासुकी,नवीन कुमार सिंग, पवन कुमार सिन्हा, अरुण कुमार परमार, संजय कुमार, भोर सिंग यादव, सुनील कुमार, निवडणूक निरीक्षक (पोलिस) अजय कुमार, निवडणूक निरीक्षक (खर्च) देवरंजन मिश्रा, संतोष कुमार मिश्रा, दीपक आनंद, पोलिस अधीक्षक (ग्रामीण) हर्ष पोद्दार, नागपूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त अजय चारठाणकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे उपस्थित होते.
मतदान केंद्रांवरील पार्किंग व्यवस्थेपासून ते मतदानापर्यंतच्या संपूर्ण प्रक्रियेपर्यंत मतदारांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याबाबत निवडणूक विभागाने स्थानिक पातळीवर यथाशक्य सुविधा पुरविल्या पाहिजे. निर्भय व निरपेक्ष वातावरणात मतदारांना आपल्या मतदानाचा हक्क बजावता आला पाहिजे. कुठल्याही प्रकारचा अडथळा हा मतदारांना मतदानाच्या दिवशी येऊ नये यासाठी सर्व यंत्रणांनी दक्षता घ्यावी, असे विशेष निवडणूक निरीक्षक राम मोहन मिश्रा यांनी निर्देश दिले.
जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॅा. विपीन इटनकर यांनी यावेळी जिल्ह्यातील निवडणूक यंत्रणेच्या तयारीची सादरीकरणाद्वारे माहिती दिली. जिल्ह्यात एकूण 45 लाख 25 हजार 997 मतदार आहेत. यात पुरुष मतदारांची संख्या 22 लाख 63 हजार 890 आहे. तर महिला मतदारांची संख्या 22 लाख 61 हजार 805 आहे. तर 302 तृतीयपंथी मतदार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच निवडणूक रिंगणात असलेले उमेदवार, मतदान केंद्रांवर पुरविण्यात येणा-या सुविधा, निवडणुकीसाठी उपलब्ध असलेले मनुष्यबळ, कायदा व सुव्यवस्था आदी निवडणूक यंत्रणेच्या तयारी माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी यावेळी सादरीकरणाद्वारे दिली. जिल्हा निवडणूक यंत्रणेच्या तयारीचे यावेळी विशेष निवडणूक निरीक्षक राम मोहन मिश्रा यांनी कौतुक केले.
मतदान प्रक्रिया शांततेत पार पडावी, कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी पोलिस विभागाने घेतलेल्या दक्षतेची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी दिली. संवेदनशील भागात ड्रोनद्वारे लक्ष ठेवण्यात येत असून यात रात्रीही निगराणी होणार असल्याचे त्यांनी सांगितले. कोणत्याही परिस्थितीत कायदा हातात घेणा-यांविरुद्ध पोलिस कठोर कारवाई करेल, असे त्यांनी स्पष्ट केले.