मुंबई शहर जिल्ह्यातील मतदान केंद्रांची जिल्हाधिकारी तथा अतिरिक्त निवडणूक अधिकारी संजय यादव यांच्याकडून पाहणी – महासंवाद
मुंबई, दि. १६ : मुंबई शहर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघात २० नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान होणार आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई शहर जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून जिल्ह्यातील वरळी, शिवडी व भायखळा विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रांना जिल्हाधिकारी तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांनी संबंधित विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यासह भेट देऊन पाहणी केली.
जिल्हाधिकारी तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. यादव यांनी भेटी दरम्यान निरंतर जिल्हा निवडणूक व्यवस्थापन आराखडा, मतदान केंद्र, आरक्षित मतदार केंद्र, जिल्ह्यातील मतदान केंद्रांवर किमान सुविधा, मतदान केंद्रातील व्यवस्थापन, वेब कास्टिंग, रूट मॅप, सेक्टर मॅप, क्षेत्र नकाशा, संप्रेषण योजना (Communication Plan), मतदान कक्षात मतदार सहाय्यकांच्या नियुक्ती, वाहन व्यवस्था, मतदान चिठ्ठ्या याबाबत सविस्तर आढावा घेऊन माहिती जाणून घेतली.
भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करून मतदान प्रक्रिया मुक्त, शांततेत व पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी आवश्यक सूक्ष्म नियोजन करून पर्यायी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांनी संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिले. श्री. यादव म्हणाले की, मतदान केंद्रावर नियुक्त महिला अधिकारी-कर्मचारी यांच्या राहण्यासाठी सुयोग्य व्यवस्था करावी, दिव्यांग मतदारांसाठी मतदान केंद्रनिहाय समन्वय अधिकारी नेमावा, मतदान केंद्रांवर दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी सहाय्यता कक्ष, हिरकणी कक्ष, पिण्याचे पाणी व्यवस्था, दिशादर्शक फलक यांचे काटेकोरपणे नियोजन करण्यात यावे, असे निर्देश श्री. यादव यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
यावेळी शिवडी विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी गणेश सांगळे, भायखळा विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी कृष्णा जाधव, वरळी विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. रत्नदीप गायकवाड उपस्थित होते.