पालकमंत्र्यांच्या हस्ते १७९ गरजवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वाटप व ५२ गुणवंतांचा सत्कार; पाच विद्यार्थ्यांना ५ हजारांची आर्थिक मदत
यवतमाळ, दि. ५ (जिमाका) : पालकमंत्री संजय राठोड यांच्या संकल्पनेतून दिग्रस तालुक्यातील दहावी व बारावीत शिक्षण घेणाऱ्या १७९ गरजवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वाटप व पदवी, पदविका आणि पदव्युत्तर शिक्षण क्षेत्रातील ५२ गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
दिग्रस येथील मातोश्री विमालदेवी चिरडे मंगल कार्यालयात या विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विजय बंग तर मार्गदर्शक प्रा. सुधीर पाठक होते. यासह जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सुधीर देशमुख, राजकुमार वानखेडे, उत्तम ठवकर आदी मान्यवर उपस्थित होते.
पालकमंत्री संजय राठोड मनोगत व्यक्त करतांना म्हणाले, गोरगरीब गरजवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळावी यासाठी सर्वजण मिळून प्रयत्न करीत आहोत. ही शिष्यवृत्ती देताना पारदर्शकता असावी यासाठी समिती नेमून त्यात पत्रकारांचा समावेश केला. या माध्यमातून सर्व जाती धर्माच्या गरजवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येते आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला जातो.
दिग्रसमध्ये ई- लायब्ररी सुरू करणार
शहरी आणि ग्रामीण भागातील होतकरू विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी दिग्रसमध्ये १२ कोटी खर्चून ई-लायब्ररी सुरू करणार आहोत. लवकरच त्यासाठी स्वतंत्र इमारत बांधून ई-लायब्ररी सुरू होणार आहे. तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी गाव तिथे पुस्तके देणार आहोत. गावातील शिक्षित तरुणांना जिल्हा परिषद शाळेत कंत्राटी शिक्षकपदी नेमणूक केली जात आहे. दहावी व बारावीत विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकार सकारात्मक निर्णय घेत असल्याचे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीचे क्षेत्र मिळाले नाही तर अप्रिय घटना घडल्याचे उदाहरण आपण पाहिले आहे. त्यामुळे पालकांनी मुलांना त्यांच्या आवडीनुसार करिअर निवडू द्यावे त्यांना सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री संजय राठोड यांनी पालकांना केले.
यावेळी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या जलसंपदा विभागाच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन सहायक अभियंता पदी निवड झालेल्या खेकडी येथील सुधीर सुदेश चव्हाण या विद्यार्थ्याचा पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच दिग्रस तालुक्यातील वरंदळी, कळगाव, रोहनादेवी, पेलू येथील पाच विद्यार्थ्यांना प्रत्येकी पाच हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली. त्याचा धनादेश पालकमंत्र्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना यावेळी देण्यात आला.
कार्यक्रमाप्रसंगी प्रा. सुधीर पाठक यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी शिक्षण क्षेत्रातील गुणवंतांचा सत्कार केलाच पाहिजेत. त्यामुळे इतरांना प्रेरणा मिळते,असे सांगून पालकमंत्री संजय राठोड यांच्या सामाजिक बांधिलकीची कौतुक केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेंद्र मिश्रा यांनी केले. प्रास्ताविक प्रणित मोरे यांनी तर आभार अभय इंगळे यांनी मानले.