विकसित भारत संकल्प यात्रेमुळे केंद्र पुरस्कृत योजना तळागाळापर्यंत पोहोचल्या – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे – महासंवाद

0 26

विकसित भारत संकल्प यात्रेची ग्रामीण स्तरावरील सांगता

सांगली, दि. 5 (जि. मा. का.) : शासकीय योजनांचा लाभ प्रत्येक घरापर्यंत पोहोचावा या उद्देशाने विकसित भारत संकल्प यात्रा काढण्यात आली. केंद्र पुरस्कृत योजनांची माहिती, आवश्यक कागदपत्रे याबाबतचे प्रबोधन जिल्ह्यात गेल्या दीड महिन्यापासून 11 व्हॅनव्दारे करण्यात आले. या माध्यमातून केंद्र शासनाच्या कल्याणकारी योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत झाली असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आज येथे केले.

         कवलापूर येथे आयोजित विकसित भारत संकल्प यात्रेच्या ग्रामीण स्तरीय सांगता कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. खासदार संजय पाटील यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी कवलापूरच्या सरपंचा उज्ज्वला गुंडे, अपर पोलीस अधीक्षक रितू खोखर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) शशिकांत शिंदे, तहसीलदार अपर्णा मोरे-धुमाळ, भानुदास पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, नागरिक, लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सांगली जिल्हा प्रशासन व ग्रामपंचायत कवलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

         पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले, जिल्ह्यात दिनांक २४ नोव्हेंबरपासून विकसित भारत संकल्प यात्रा सुरू झाली. तेव्हापासून आजअखेर ११ व्हॅनद्वारे जिल्ह्यातील ६९६ ग्रामपंचायतींमध्ये या रथयात्रेच्या माध्यमातून केंद्र पुरस्कृत शासकीय योजनांची माहिती नागरिकांना देण्यात आली. या कालावधीत जवळपास दीड लाख नागरिक या यात्रेत सहभागी झाले. तर जवळपास ३ हजार लाभार्थींना विविध योजनांचा लाभ देण्यात आला. या माध्यमातून केंद्र शासनाच्या कल्याणकारी योजनांची माहिती लाभार्थींपर्यंत पोहोचवली गेली, वंचित लाभार्थींची नोंदणी केली गेली व योजनांचा लाभ तळागाळातील लाभार्थींपर्यंत पोहोचवला गेला असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

            या यात्रेंतर्गत जिल्ह्यात आयुष्मान कार्डच्या वाटपामध्ये भरीव कामगिरी झाली असल्याचे सांगून पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले, आयुष्मान कार्ड मिळाल्यामुळे 5 लाख रूपयापर्यंत मोफत उपचार मिळणार आहेत. विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून कवलापूरच्या विकासासाठी भरीव निधी उपलब्ध करून दिला असून यापुढेही कवलापूरच्या विकासासाठी कटिबध्द असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

         खासदार संजय पाटील म्हणाले, सर्व सामान्यांच्या जीवनात परिवर्तन होण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून ग्रामीण/शहरी/नगरपालिका स्तरावर प्रत्येक गरजू लाभार्थीपर्यंत योजनांची माहिती पोहोचवली गेली. लाभार्थीस त्या योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळवून दिला गेला. यामध्ये जवळपास ४ लाख आयुष्मान कार्ड वाटप केल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

विविध प्रमाणपत्र वाटप

         यावेळी पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते विविध शासकीय योजनांच्या लाभार्थीना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. यामध्ये अटल बांधकाम कामगार घरकुल योजना, मोदी आवास योजना, माझी कन्या भाग्यश्री, दिव्यांग कल्याण योजना, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे कार्ड, संजय गांधी निराधार योजना, सुकन्या समृद्धी योजना, महिला सन्मान योजना आदि योजनांच्या लाभार्थीना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.

यावेळी विकसित भारत संकल्प यात्रेची चित्रफीत दाखवण्यात आली. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन, दीप प्रज्वलन व रोपट्यास पाणी देऊन कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

स्टॉलना उत्स्फूर्त प्रतिसाद

         यावेळी उभारण्यात आलेल्या विविध स्टॉलना पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे व खासदार संजय पाटील यांच्यासह मान्यवरानी भेट देऊन पाहणी केली. यामध्ये आयुष्मान भारत, रोजगार हमी योजना, महा आवास योजना, महसूल विभाग चावडी, पुरवठा विभाग, महिला व बालविकास विभाग, कृषी विभाग, पशुसंवर्धन विभाग, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जलजीवन मिशन, पोस्ट विभाग, जिल्हा मध्यवर्ती बँक या शासकीय विभागासह महिला बचत गटांच्या स्टॉलना उपस्थित लाभार्थीनी भेट देऊन माहिती घेतली.

शोभा यात्रा

            मान्यवरांची शोभा यात्रा स्मार्ट पीएचसी ते ग्रामपंचायत कार्यालय पटांगण ते कार्यक्रमस्थळ अशी काढण्यात आली.

         स्वागत सरपंच उज्ज्वला गुंडे यांनी केले. प्रास्ताविक उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा नोडल अधिकारी शशिकांत शिंदे यांनी केले. लाभार्थीनी मनोगत व्यक्त केले. यावेळी यात्रा कालावधीत सहकार्य केलेल्याप्रती ऋणनिर्देश व्यक्त केले. भानुदास पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.

प्राथमिक आरोग्य केंद्राचे उद्घाटन

            प्रारंभी आयुष्मान आरोग्य मंदिर (स्मार्ट पीएचसी) कवलापूरचे उद्गाटन पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे व खासदार संजय पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोखर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद पोरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गुरव यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते स्मार्ट पीएचसी परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.

कवलापूर येथे अनुसूचित जाती व नवबौध्द वस्तीचा विकास करणे योजनेंतर्गंत रस्ते कामाचे उद्घाटनही पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते करण्यात आले. 

00000

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.