योजनांपासून वंचित राहिलेल्यांना संकल्प यात्रेसोबत जोडा – केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी
- खेमजई (ता. वरोरा) येथे विकसित भारत संकल्प यात्रेचे आयोजन
- दूरदृश्यप्रणालीद्वारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा संवाद
चंद्रपूर, दि. १६ : केंद्र सरकारच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या विकसि भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून जवळपास 22 योजनांची माहिती नागरिकांच्या घरापर्यंत पोहचविण्यात येत आहे. शासकीय यंत्रणेतील अधिकारी – कर्मचारी लोकांमध्ये जावून याबाबत जनजागृती करीत आहे. त्यामुळे आतापर्यंत विविध योजनांपासून वंचित राहिलेल्या नागरिकांना या यात्रेसोबत जोडा व त्यांना लाभ मिळवून द्या, असे आवाहन केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी केले. तर दूरदृश्यप्रणालीद्वारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विविध राज्यातील लाभार्थ्यांशी संवाद साधला.
वरोरा तालुक्यातील खेमजई येथे विकसीत भारत संकल्प यात्रेदरम्यान आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मंचावर राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर, जिल्हाधिकारी विनय गौडा, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी आदी उपस्थित होते.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश प्रगतीपथावर मार्गक्रमण करीत आहे, असे सांगून केंद्रीय मंत्री श्री. पुरी म्हणाले, गत 9 वर्षात जे काम झाले आहे, आणि भविष्यात केंद्र सरकार नागरिकांच्या कल्याणासाठी जे काम करणार आहे, अशा बाबींची माहिती या संकल्प यात्रेतून जनतेपर्यंत पोहचविण्यात येत आहे. सोबतच महत्वाच्या विविध शासकीय योजनांचा लाभसुध्दा या माध्यमातून नागरिकांना घरपोच मिळण्यास मदत होत आहे. त्यामुळे या यात्रेत जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे. योजनांपासून वंचित असलेल्यांना यात सहभागी करावे. विकसीत भारत संकल्प यात्रेअंतर्गत देशभरात 3200 एलईडी व्हॅनद्वारे जनजागृती करण्यात येत आहे. आतापर्यंत सदर व्हॅन 65 हजार गावांमध्ये आणि 5 हजार शहरात गेली असून ‘मेरी कहानी, मेरी जुबानी’ अंतर्गत 1 कोटी 80 लक्ष लाभार्थ्यांनी आपले अनुभव कथन केले आहे.
पुढे श्री. पुरी म्हणाले, चंद्रपूर जिल्ह्यात सुरवातीला 102 पेट्रोलपंप होते, आज 131 पेट्रोलपंप आहेत. 2014 मध्ये जिल्ह्यात 3 लक्ष 34 हजार एल.पी.जी गॅस कनेक्शन होते. ती संख्या आज चंद्रपूर जिल्ह्यात 6 लक्ष 32 हजार झाली असून जिल्ह्यातील 34495 कुटुंबांना उज्वला गॅस योजनेचा लाभ देण्यात आला आहे. 2014 मध्ये देशात 14 कोटी नागरिकांकडे गॅस कनेक्शन होते. आता 2023 मध्ये हा आकडा 32 कोटींवर पोहचला आहे. सन 2014 पर्यंत केवळ 1 लक्ष 5 हजार नागरिकांना प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ मिळाला होता, तर 2014 पासून 2023 पर्यंत ग्रामीण आणि शहरी मिळून 4 कोटी नागरिकांना आवास योजनेंतर्गत घरकूल देण्यात आले आहे. गत सरकारमध्ये देशातील 18 हजार गावांमध्ये वीज नव्हती तर आज 2023 पर्यंत 6 लक्ष 50 हजार गावांमध्ये विद्युतीकरण झाले आहे. तसेच देशात आजच्या घडीला 50 कोटींपेक्षा जास्त लोकांचे बँकखाते काढण्यात आले आहे. तसेच आज जगात भारताची अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावर आहे, भविष्यात ती तिस-या क्रमांकावर पोहचणार आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
विकसीत भारत या संकल्पात चंद्रपूरचे मोठे योगदान राहील : पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार
केंद्र सरकारने नागरिकांच्या कल्याणासाठी विविध योजना सुरू केल्या आहेत. शेतक-यांच्या खात्यात 6 हजार रुपयांचा थेट लाभ, आयुष्मान भारत अंतर्गत मोफत आरोग्य सेवा आदी योजनांचा यात समावेश आहे. या योजनांपासून कोणीही वंचित राहू नये म्हणून चित्ररथ आपल्या दारी येत आहे. गावातील लोकांनी या योजनांचा फायदा घ्यावा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात विकसीत भारत हा संकल्प आहे. जग बदलविण्यासाठी आपणही संकल्प करणे गरजेचे आहे. जिल्ह्यात मिशन शौर्य, मिशन जय किसान, मिशन ऑलंपिक, अयोध्येच्या राममंदिरासाठी काष्ट, नवीन संसद भवनासाठी चंद्रपूरचे लाकूड अशा अनेक बाबी करण्यात आल्या आहेत. चंद्रपूर हा वाघांचा जिल्हा असल्यामुळे विकसित भारत या संकल्पात चंद्रपूरचे मोठे योगदान राहील, अशी ग्वाही जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना जिल्हाधिकारी विनय गौडा म्हणाले, जिल्ह्यातील 825 ग्रामपंचायतींपैकी आतापर्यंत 273 ग्रामपंचायतींमध्ये विकसीत भारत संकल्प यात्रा गेली आहे. यात एकूण 1 लक्ष 42 हजार 595 नागरिक सहभागी झाले आहेत. यात्रेदरम्यान 17558 कुटुंबाची आरोग्य तपासणी, 2557 जणांची उज्वला गॅस कनेक्शनकरीता नोंदणी, 6300 जणांना आयुष्मान भारतचा लाभ देण्यात आल्याचे जिल्हाधिका-यांनी सांगितले.
सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाला विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी, लोकप्रतिनिधी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
०००