शासकीय योजनांचा लाभ घेऊन नागरिकांनी जीवनमान उंचवावे – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

0 10

सांगली, दि. १६ (जिमाका) : विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून नागरिकांनी शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ घेऊन स्वतःचे जीवनमान उंचवावे, असे आवाहन कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आज केले.

विकसित भारत संकल्प यात्रेंतर्गत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज देशभरातील निवडक जिल्ह्यातील लाभार्थींना दूरदृश्यप्रणालीद्वारे मार्गदर्शन केले. याचे प्रसारण मिरज तालुक्यातील बेळंकी येथे झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.

ग्रामपंचायत कार्यालय आवारात झालेल्या या कार्यक्रमास सरपंचा सारिका शिंदे, जिल्हा परिषद अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निखील ओसवाल, मिरजचे उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) शशिकांत शिंदे, मिरज तहसीलदार अर्चना मोरे-धुमाळ, मिरजच्या गटविकास अधिकारी  डॉ. संध्या जगताप, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद पोरे, जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर, सुशांत खाडे, मोहन व्हनखंडे, सहायक गटविकास अधिकारी ज्ञानदेव मडके आदि उपस्थित होते.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे संबोधन प्रसारित

यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे मार्गदर्शन दूरदृष्य प्रणालीद्वारे प्रसारित करण्यात आले. या संबोधनात त्यांनी केंद्र शासनाच्या वतीने नागरिकांच्या मूलभूत गरजा, आरोग्य, पोषण, दर्जेदार प्राथमिक सोयी सुविधा यासह अन्य बाबींसाठी केंद्र शासनाच्या अनेकविध कल्याणकारी योजनांतून युवा व महिला वर्गाचे सबलीकरण करण्यात येत असल्याचे सांगितले. या योजनांचा लाभ घेऊन नागरिकांनी इतरांपर्यंत या योजनांचा प्रसार करावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. या कार्यक्रमास लाभार्थींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले, विकसित भारत संकल्प यात्रा हे देशव्यापी अभियान जिल्ह्यात 24 नोव्हेंबरपासून सुरू असून, ग्रामीण भागात 8 जानेवारीपर्यंत जिल्ह्यातील 696 ग्रामपंचायतींमध्ये या व्हॅन फिरणार आहेत. या माध्यमातून गावागावात शासन व प्रशासन नागरिकांपर्यंत पोहोचत आहे. केंद्र शासनाच्या जवळपास 50 हून अधिक योजनांबाबत जागृती व प्रबोधन या माध्यमातून केले जात आहे. या योजनांसाठी पात्र वंचित लाभार्थींनी नोंदणी करावी. अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली या योजनांचा लाभ घेऊन स्वतःच्या जीवनात सकारात्मक बदल घडवावा व इतरांनीही त्यासाठी प्रेरित करावे, असे ते म्हणाले.

कामगार विभागाच्याही इमारत बांधकाम कामगारांसाठी विविध योजना आहेत. त्याचा लाभ कामगारांना दिला जात असल्याचे सांगून पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले, विकसित भारत संकल्प यात्रेंतर्गत आतापर्यंत जिल्ह्यातील 354 ग्रामपंचायतींमध्ये 10 व्हॅनच्या माध्यमातून 70 हजारहून अधिक नागरिकांनी या कार्यक्रमात सहभाग नोंदवला आहे. केंद्र शासनाच्या जवळपास 50 हून अधिक कल्याणकारी योजनांचा लाभ तळागाळातील लोकांपर्यंत व वंचितांपर्यंत पोहोचविण्यासाठी हा कार्यक्रम सुरू आहे. आतापर्यंत 20 हजारपेक्षा अधिक आयुष्मान कार्ड वाटप करण्यात आले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. विकासाच्या प्रक्रियेमध्ये प्रत्येक घटकाला सामावून घेण्यासाठी सुरू केलेल्या विकसित भारत संकल्प यात्रा या महत्वाकांक्षी उपक्रमाबद्दल त्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा देत ऋणनिर्देश व्यक्त केले.

स्वागत डॉ. शिंदे यांनी केले. प्रास्ताविकात शशिकांत शिंदे यांनी या अभियानाचा हेतू व माहिती विषद केली. या कार्यक्रमास जिल्हा परिषद, आरोग्य विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांसह अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स, महिला, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी रथयात्रेंतर्गत विविध विभागांच्या स्टॉलना पालकमंत्री डॉ. खाडे यांनी भेट देऊन पाहणी केली.

जिल्ह्यातील 20 ग्रामपंचायतीत रथयात्रा

बेळंकीसह आज जिल्ह्यातील भाटशिरगाव, कांदे (ता. शिराळा), ताडाचीवाडी, बाणुरगड (ता. विटा खानापूर), जानराववाडी (ता. मिरज), भिवर्गी, पांडोझरी (ता. जत), मोहिते वडगाव, अंबक (ता. कडेगाव), कुकटोळी, म्हैसाळ एम. (ता. कवठेमहांकाळ), पडवळवाडी, अहिरवाडी (ता. वाळवा), धावडवाडी, नेलकरजी (ता. आटपाडी), पुणदी (वा), रामानंदनगर (ता. पलूस) आणि कवठेएकंद, नागाव क. (ता. तासगाव) येथे विकसित भारत संकल्प यात्रा अंतर्गत रथयात्रा पार पडली.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.