मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची खासदार सांस्कृतिक महोत्सवाला भेट
नागपूर दि. 1 : नागपूर येथील खासदार सांस्कृतिक महोत्सवाने देश-विदेशातील नामवंत कलाकार तसेच स्थानिक कलाकारांच्या कलाकृती नागपूरकर रसिकांना उपलब्ध करून दिल्या आहेत. ही येथील जनतेसाठी मोठी सांस्कृतिक मेजवानी ठरत आहे. खासदार महोत्सवाची कलाकारांप्रमाणेच जनताही आतुरतेने वाट बघत असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे काढले.
खासदार सांस्कृतिक महोत्सवाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज भेट दिली. त्याप्रसंगी ते बोलत होते. महोत्सवाचे आयोजक तथा केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ज्येष्ठ संपादक श्रीपाद अपराजित, खासदार कृपाल तुमाने, आमदार प्रवीण दटके, आशिष जायस्वाल, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती मनोज सुर्यंवंशी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा आदी उपस्थित होते.
श्री नितीन गडकरी यांची ओळख विकास पुरुष म्हणून संपूर्ण देशात आहे. रस्ते, इमारती व पायाभूत सुविधांच्या निर्मितीसोबतच त्यांच्यातील कलासक्त पुरूष क्रीडा, संगीत, नृत्य आणि विविध कलांच्या माध्यमातून आपली कलासंस्कृती जोपासण्याचे काम करित असतो. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाला शोभेल असे हे आयोजन असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले की खासदार सांस्कृतिक महोत्सवातून विदर्भातील स्थानिक कलाकारांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळत असल्याने व अन्य कलाकांरांच्या कला बघण्याची संधी मिळत असल्याने त्यांच्यासाठी हा महत्वाचा महोत्सव आहे.
नितीन गडकरी यांनी प्रास्ताविकातून सांस्कृतिक प्रगतीसाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात येत असल्याचे सांगितले.
यावेळी मान्यवरांनी ‘द पियुष मिश्रा प्रोजेक्ट बल्लीमारान’ या कार्यक्रमाचा आनंद घेतला. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पियुष मिश्रा व गीतरामायण नाटीका प्रमुख अरूणा भिडे यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला रसिक प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0000