मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गंगाधरराव फडणवीस मेमोरियल डायग्नोस्टिक सेंटरचे भूमिपूजन
नागपूर ,दि. 1 : गंगाधरराव फडणवीस मेमोरियल डायग्नोस्टिक सेंटरमध्ये अत्याधुनिक वैद्यकीय निदान उपलब्ध होत असल्यामुळे आजारांचे निदान अचूक होणार आहे त्यामुळे गरीब रुग्णांचे प्राण वाचविणे शक्य होईल. सेवाभावीवृत्तीने सुरू होणारा रुग्ण सेवेचा हा यज्ञकुंड अव्याहतपणे सुरू राहील, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे व्यक्त केला.
श्री. सिध्दीविनायक सेवा फाऊंडेशनच्यावतीने वर्धा मार्गावरील पावनभूमी येथे गंगाधरराव फडणवीस मेमोरियल डायग्नोस्टिक सेंटरचे भूमिपूजन मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार कृपाल तुमाने, आमदार सर्वश्री कृष्णा खोपडे, मोहन मते, ॲड. आशिष जायस्वाल, श्री.सिद्धिविनायक सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप जोशी, अमोल काळे आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, सामान्य माणसाला न्याय देण्याचे निर्णय घेताना आरोग्य सेवेला प्राधान्य दिले आहे. राज्यातील गरीब व गरजू रुग्णांना अत्यावश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध होण्यासाठी जिल्हास्तरावर वैद्यकीय महाविदयालय सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. रुग्णांची संख्या व प्रतिक्षा यादी लक्षात घेता सेवाभावी संस्थांनी पुढे येवून आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी सहकार्य करावे. बदलती जीवनशैली तसेच वातावरणातील बदलामुळे आजारांचे प्रमाण वाढत आहे. कर्करोगाच्या रुग्णांच्या निदानासाठी अत्याधुनिक रुग्णालयांची आवश्यकता आहे. गंगाधरराव फडणवीस डायग्नोस्टिक सेंटरमुळे या कामास प्रोत्साहन मिळेल, असे त्यांनी सांगितले.
राजकारणाला समाजकारणाची जोड असणे आवश्यक आहे. फडणवीस कुटुंबाने सर्वसामान्य जनतेचे जीवन सुसहाय्य व्हावे यासाठी सातत्याने काम केले आहे.सेवाभावी संस्थांनी उच्च दर्जाच्या तसेच सर्व सामान्यांना परवडणाऱ्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्यास शासनातर्फे संपूर्ण सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.
राजकारणासोबत शिक्षण ,आरोग्य व विकासाच्या क्षेत्रात काम करण्याची आवश्यकता व्यक्त करतांना केंद्रीय मंत्री श्री. गडकरी म्हणाले की, प्राण वाचविणाऱ्या आरोग्य सेवा गरिबांपर्यंत पोचविण्यासाठी गंगाधरराव फडणवीस डायग्नोस्टिक सेंटर महत्त्वाची भूमिका बजावेल. विदर्भातील जनतेपर्यंत या सेंटरच्या माध्यमातून उत्तम आरोग्य सेवा पोहोचणार आहेत. गंगाधर फडणवीस यांनी प्रतिकूल परिस्थितीत समाजसेवेला प्राधान्य दिल्याचे श्री.गडकरी यांनी सांगितले.
अन्न ,वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजांसोबत बदलत्या काळानुसार शिक्षण,आरोग्य आणि रोजगार हे महत्वाचे प्रश्न निर्माण झाले आहेत. सामान्य जनतेला परवडणाऱ्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन तत्पर आहे, त्यासोबतच खाजगी व सेवाभावी संस्थांनी पुढे येण्याची आवश्यकता व्यक्त करताना श्री. फडणवीस म्हणाले, सर्वसामान्यांना आरोग्यावर खर्च करावा लागतो. हा खर्च टाळणे शक्य आहे.अशा संस्थांच्या मागे समाजानेही उभे राहण्याची आवश्यकता आहे. गरीब रुग्णांना नि:शुल्क सेवा उपलब्ध व्हावी, अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री यांनी व्यक्त केली.
प्रांरभी, संदीप जोशी यांनी प्रास्ताविकात गंगाधरराव फडणवीस डायग्नोस्टिक सेंटर येत्या सहा महिन्यात पूर्ण करुन या सेंटरचे लोकार्पण करण्यात येईल. तसेच अत्यंत उच्च तंत्रज्ञानाने सुसज्ज उपचारपध्दती येथे उपलब्ध होतील, असे सांगितले. स्वागत ॲड. अक्षय नाईक यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन रेणुका देशकर यांनी केले, तर संस्थेचे सचिव पराग सराफ यांनी आभार मानले.
00000