शासन आपल्या दारी व महाआरोग्य अभियान यशस्वीतेसाठी सर्व यंत्रणांचे योगदान महत्त्वाचे: :पालकमंत्री दादाजी भुसे    

0 11

नाशिक, दिनांक १२ (जिमाका वृत्तसेवा): महाराजस्व अभियानांतर्गत ‘शासन आपल्या दारी’ व ‘धर्मवीर आनंद दिघे महाआरोग्य अभियाना’च्या यशस्वीतेसाठी समर्पित भावनेतून सर्व यंत्रणांचे योगदान महत्त्वाचे असून त्यादृष्टीने  प्रयत्नपूर्वक नियोजन करण्यात यावे, अशा सूचना  राज्याचे बंदरे व खनिकर्म मंत्री तथा पालकमंत्री दादाजी भुसे यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात आज आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी गंगाथरन डी., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात, जिल्हा पुरवठा अधिकारी अरविंद नरसीकर, उपजिल्हाधिकारी गणेश मिसाळ, ज्योती कावरे, सहाय्यक जिल्हाधिकारी जतिन रहेमान, महिला बालकल्याण अधिकारी अजय फडोळ, जिल्हा समाज कल्याण अधिकारी योगेश पाटील, समाज कल्याण सहआयुक्त सुंदरसिंग वसावे, महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बापुसाहेब नागरगोजे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांच्यासह संबंधित यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री दादाजी भुसे म्हणाले की, प्रशासनाची लोकाभिमुख प्रशासन म्हणून ओळख निर्माण होण्यासासाठी ‘शासन आपल्या दारी’ उपक्रम राबविण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून गटनिहाय या उपक्रमाचे आयोजन करण्यात येत असून हा उपक्रम सातत्याने सुरू राहणार आहे. या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांना सर्व शासकीय योजनांचा लाभ एकाच ठिकाणी मिळण्यास मदत होणार आहे. ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमाद्वारे शासकीय योजनांचा लाभ तळागाळातील नागरिकांना मिळावा यासाठी संबधित अधिकारी आठवड्यातून किमान दोन दिवस प्रत्यक्ष गावात उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती पालकमंत्री श्री. भुसे यांनी यावेळी दिली.

‘शासन आपल्या दारी’ उपक्रमांच्या माध्यमातून ग्रामीण भागात शेतकरी, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, सामान्य नगारिक यांना आवश्यक ते सर्व दाखले एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे. तसेच समाज कल्याण विभागामार्फत तृतीयपंथीयांना ओळखपत्र अर्ज वाटप, विभागीय जात पडताळणी समिती अर्ज स्वीकृती करण्यात येणार आहे. आदिवासी विभागाच्या विशेष केंद्रीय सहाय्य, न्यूक्लियस बजेट यांच्या वैयक्तिक व सामाजिक लाभार्थ्यांसाठीच्या योजना जिल्हा अग्रणी बँक, जिल्हा परिषद ग्रामविकास विभाग, महसूल विभाग, जिल्हा उद्योग केंद्र, कामगार विभाग, महिला आर्थिक विकास महामंडळ, कृषि विकास विभाग, महावितरण, आरोग्य यंत्रणा व मानव विकास संसाधन या सर्व शासकीय विभागांच्या विविध योजनांची माहिती, अर्ज वाटप व नोंदणी या उपक्रमाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे, असेही पालकमंत्री भुसे यांनी यावेळी सांगितले.

श्री. भुसे म्हणाले की, ‘धर्मवीर आनंद दिघे महाआरोग्य अभियान’ 14 डिसेंबर 2022 ते 25 जानेवारी 2023 या कालावधीत 592 उपकेंद्र, 9 प्राथमिक आरोग्य पथके, 110 प्राथमिक व 30 नागरी आरोग्य केंद्र, 24 ग्रामीण रुग्णालये, 6 उपजिल्हा रुग्णालये, जिल्हा रुग्णालय, महिला रुग्णालय व विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय यांच्यामार्फत राबविण्यात येणार आहे. या अभियानात आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका यांच्यामार्फत 14 ते 31 डिसेंबर 2022 या कालावधीत घरोघरी जाऊन प्राथमिक आजारांची तपासणी करण्यात येणार आहे. आरोग्य विषयक शासकीय योजनांच्या माध्यमातून रुग्णांवर औषोधोपचार, आवश्यक त्या चाचण्या व शस्त्रक्रिया देखील मोफत करण्यात येणार आहेत. उपचार व तपासणीसाठी येणाऱ्या रूग्णांची वाहतुक व्यवस्था मोफत करण्यात येणार असून शस्त्रक्रिया अथवा इतर उपचारांसाठी रूग्णालयात दाखल झालेल्या रूग्णांना निवास व जेवण मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासोबतच शालेय विद्यार्थ्यांची डोळे तपासणी करून त्यांना मोफत चष्मे वाटप करण्यात येणार असून शारीरिक अपंगत्व असलेल्या रूग्णांना कृत्रिम अवयव देखील मोफत पुरविण्यात येणार आहे.

या आरोग्य अभियानासाठी शासकीय आरोग्य यंत्रणा, जिल्हा परिषद अधिनस्थ सर्व शासकीय यंत्रणा यांच्यासह रत्नानिधी चॅरिटेबल ट्रस्ट, मुंबई, मराठा विद्याप्रसारक संस्थेचे डॉ. वसंतराव वैद्यकीय महाविद्यालय, एस. एम. बी. टी. वैद्यकीय महाविद्यालय, इंडियन मेडिकल असोसिएशन, केमिस्ट ॲण्ड ड्रगिस्ट असोसिएशन, रोटरी क्लब नाशिक यांच्या सहकार्याने अभियान राबविण्यात येणार आहे. शासकीय योजनांपासून कोणीही वंचित राहू नये यासाठी सर्व लोकप्रतिनिधींनी यात सहभागी होण्याचे आवाहन पालकमंत्री श्री. भुसे यांनी यावेळी केले.

000

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.