जिल्ह्यांचा समृद्धीकडे वेगवान प्रवास
नागपूर ते मुंबई हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिनांक ११ डिसेंबर रोजी होणार आहे या महामार्गावरील दहा जिल्ह्यांचा समृद्धीकडे वेगवान प्रवास भविष्यात पाहायला मिळेल. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गचा पहिला टप्पा विक्रमी वेळेत पूर्ण करण्यात आला असून पुढील शिर्डी ते ठाणे हा टप्पाही लवकरच पूर्ण होऊन जनतेला या महामार्गाचा उपयोग करता येणार आहे नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समृद्धी महामार्गाची पाहणी केली.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा नागपूर जिल्ह्यातील शिवमडका या गावापासून ते ठाणे जिल्ह्यातील आमनेगाव यांना जोडणारा महामार्ग असून यामुळे राज्यातील रस्त्याचे जाळे एकमेकांशी जोडून दळणवळण गतिमान होणार आहे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग प्रकल्पामुळे राष्ट्रीय दळणवळण आणि मालवाहतूक सुविधेत ६% योगदान मिळण्याची अपेक्षा आहे
समृद्धी महामार्ग महाराष्ट्राच्या विकासाला गती देणारा हा प्रकल्प, ठरणार आहे
या महामार्गाची लवकरच मुंबई पर्यंतच्या मार्गाची देखील पूर्तता होईल. तूर्तास शिर्डी पर्यंत जाता येईल. महामार्गामुळे राज्यात उद्योग – कृषी – पर्यटन या तीनही क्षेत्राला फायदा होणार!
मुंबई ते नागपूर ८१२ किलोमीटरचं अंतर कापण्यासाठी १४ तास लागतात. समृद्धी महामार्ग मुळे हे अंतर पार करण्यासाठी ८ तास लागतील. ७०१ किलोमीटर या महामार्गाची लांबी आहे.
औरंगाबाद हे मध्यावर आहे. त्यामुळे औरंगाबाद ते नागपूर जाण्यासाठी ४ तास आणि औरंगाबाद ते मुंबई जाण्यासाठी ४ तास लागतील.
हा मार्ग राज्यातल्या १० जिल्ह्यांमधून जाणार आहे. नागपूर, वर्धा, अमरावती, वाशिम, बुलढाणा, जालना, औरंगाबाद, अहमदनगर, नाशिक, ठाणे या जिल्ह्यांमधून जाणारा हा महामार्ग आहे.
५० हून अधिक उड्डाणपूल, २४ इंटरचेंजेस असतील. हे इंटरचेंजेस वाहनांसाठी एक्झिट पॉईंट असतील. दर पाच किलोमीटरवर अत्यावश्यक टेलिफोनची सुविधा असेल. फूड प्लाझा, रेस्टॉरंटस्, बस वे , ट्रक टर्मिनस, ट्रॉमा सेंटर या महामार्गावर असतील. समृद्धी महामार्गावर वायफायची सुविधा असेल. तसेच ट्राफिक कंट्रोलसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. या महामार्गावर २० ठिकाणी कृषी समृद्धी केंद्राची उभारणी करण्यात येणार आहे. हे वैशिष्टय आहे, यातून कृषी व्यवसायाला मोठा फायदा होणार आहे.
राहुल भालेराव
जिल्हा माहिती अधिकारी
ठाणे