समृद्धी महामार्गातून महाराष्ट्राची उद्योगभरारी
बहुप्रतिक्षित असलेला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग आता पूर्णत्वास येताना दिसत असून राज्यासह देश-विदेशातील उद्योजक, तरुण, स्टार्टअप्स आणि पर्यटकांचे लक्ष लागून राहिलेला पथदर्शी प्रकल्प दृष्टिक्षेपात येत आहे. प्रारंभी या महामार्गासाठी लागणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनींचे भूसंपादन हे तत्कालीन शासनापुढील मोठे आव्हान होते. भूसंपादन प्रक्रिया राबवितांना येणाऱ्या अडचणींवर मात करुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना भरीव मोबदला मिळवून दिला होता. हा प्रकल्प जलदगतीने पूर्ण करण्यासाठी प्रशासन देखील महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत. देशाच्या आणि राज्याच्या औद्योगिक विकासासाठी समृद्धी महामार्ग हा महत्त्वाचा प्रकल्प ठरणार आहे. या दृष्टिकोनातून महामार्गाच्या निर्माण कार्याला गतीही देण्यात येत आहे. देशाच्या आणि महाराष्ट्राच्या विकासात संजीवनी ठरणाऱ्या समृद्धी महामार्गाचा वेध घेणारा लेख…
देशाचा किंवा राज्याचा विकास साधायचा असल्यास प्रथम पायाभूत सुविधा, दर्जेदार रस्ते, कुशल मनुष्यबळ, आधुनिक तंत्रज्ञान, शासन-प्रशासनाची इच्छाशक्ती आणि उद्योगांसाठी पोषक वातावरण असणे अतिमहत्त्वाचे असते. यात महाराष्ट्राने नेहमीच आघाडी राखली आहे आणि त्यासाठी वेळोवेळी महत्त्वाकांक्षी पाऊलेही उचलली आहेत. समृद्धी महामार्गासारखा राज्यातील नागपूर, वर्धा, अमरावती, वाशीम, बुलढाणा, जालना, औरंगाबाद, अहमदनगर, पुणे आणि मुंबई अशा १० जिल्ह्यांना जोडणारा सहा पदरी महामार्ग पूर्णत्वास येणे ही एक राज्याच्या औद्योगिक क्षेत्रातील महत्त्वाची उपलब्धी ठरते. या महामार्गामुळे रस्त्यालगतच्या ग्रामीण भागांचा विकास तर होणारच आहे. त्याबरोबर राज्याच्या औद्योगिक विकासालाही चालना मिळेल. परिणामी स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगारही उपलब्ध होईल.
राज्यातील रस्ते एकमेकांशी जोडले, तर त्याचा शेतकऱ्यांपासून ते छोट्या-मोठ्या उद्योगांना मोठा फायदा होतो. याच रस्त्यांना बंदरांशी जोडले, तर आंतरराष्ट्रीय उद्योगही राज्यात गुंतवणूक करण्यासाठी पुढे येतात. राज्यातील प्रमुख रस्त्यांना बंदरांशी जोडण्याची गरज असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच सांगितले आहे. त्याप्रमाणे कार्यवाही देखील सुरु आहे. राज्यातील वाहतूक सुविधांची विविध स्तरावर चर्चा तर होतेच, यातून विविध क्षेत्रातील उद्योजकांनाही आकर्षित करण्यात मोठे यश मिळते. याच पार्श्वभूमीवर सध्या राज्यात औद्योगिक गुंतवणुकीसाठी उच्चस्तरावर परदेशी शिष्टमंडळाच्या भेटी-गाठी होऊन सामंजस्य करारही केले जात आहेत. या करारांची शंभर टक्के अंमलबजावणी होईल याकडे मुख्यमंत्र्यांनीही विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. यावरुन औद्योगिक गुंतवणुकीसाठी महाराष्ट्रात नक्कीच पोषक वातावरण निर्माण होत असल्याचे दिसते. समृद्धी महामार्ग हा त्याचाच भाग. या महामार्गाचा नागपूर ते शिर्डी हा ५३० किलोमीटरचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून त्याची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी नुकतीच प्रत्यक्ष प्रवास करुन पाहणी केली. त्याचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दि. ११ डिसेंबर रोजी लोकार्पण होणार असून त्याचे आकर्षण सर्वांनाच आहे. हा महामार्ग येत्या सहा महिन्यात पूर्ण करण्याचे नियोजन राज्य शासनाकडून करण्यात आले आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हरित ऊर्जा संकल्पनेना चालना देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्युत वाहन निर्मिती व वापर, कृषी क्षेत्रात सौर ऊर्जेच्या वापरावर अधिक भर दिला आहे. त्याचाच एक भाग म्हणून विद्युत (इलेक्ट्रिक) वाहनांसाठी मुंबईत १३४ आणि समृद्धी महामार्गालगत ७० चार्जिंग केंद्र उभारण्याचे ठरविले आहे. त्याप्रमाणे ‘महाप्रित’ची कार्यवाही देखील सुरु आहे. नुकतेच अमेरिकेतील टीट्रॅान इलेक्ट्रिक व्हेईकल निर्मिती कंपनीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन राज्यात इलेक्ट्रिक आणि हायड्रोजनवर चालणाऱ्या वाहन निर्मिती क्षेत्रात गुंतवणूक करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पुढच्या नवीन वर्षात दावोस येथे होणाऱ्या परिषदेत यासंबंधीचा सामंजस्य करार करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. हायड्रोजनवर आधारित वाहनांचा प्रकल्प राज्यात सुरू झाल्यास असा प्रकल्प सुरु करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरणार आहे.
एकंदरीतच उद्योग क्षेत्राच्या विकासासाठी राज्यात पायाभूत सोयी-सुविधा, इज ऑफ डुईंग बिजनेस, परवानग्यांसाठी एक खिडकी योजना, पोषक वातावरण, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, रस्ते, रेल्वे आणि सागरी वाहतूक व्यवस्था अधिक चांगल्याप्रकारे निर्माण करण्याचा प्रयत्न राज्य शासन करीत आहे. याचाच एक भाग असलेल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गामुळे आगामी काळात महाराष्ट्र उद्योग क्षेत्रात नक्कीच भरारी घेईल, असे चित्र निर्माण झाले आहे.
पवन राठोड
सहायक संचालक (माहिती), मुंबई.
000