राज्य उत्पादन शुल्क विभागाला नोव्हेंबर अखेरपर्यंत १२ हजार ९५२ कोटींचा महसूल

0 10

मुंबई दि. ०९ : राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात नोव्हेंबर अखेरपर्यंत १२ हजार ९५२.८२ कोटी रूपयांचा महसूल जमा झाला आहे.

विभागाने  सन 2021-22 यावर्षी एप्रिल ते नोव्हेंबर अखेरपर्यंत 9748.96 कोटी रूपयांचा महसूल जमा केला होता. सन 2021-22 यावर्षीच्या तुलनेत यावर्षी महसूलात 32.86 टक्के वाढ झाली आहे. राज्यात एप्रिल 2022 ते नोव्हेंबर 2022 या कालावधीत 34,164 गुन्ह्याची नोंद झाली असून 28 हजार 66 आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच 106.15 कोटी रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, विभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर यांच्या मार्गदर्शनाखाली विभागाने केली आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभाग राज्यात मद्य निर्मिती, घाऊक विक्री, किरकोळ विक्री इ. अनुज्ञप्त्या देणे व त्यांची तपासणी करुन नियमन करणे, मद्यावरील कर गोळा करणे इ. कार्य प्रामुख्याने करीत आहे. तसेच राज्यातील अवैध मद्य निर्मिती विक्री, वाहतूक, बनावट मद्य, परराज्यातून होणारी अवैध मद्याची तस्करी इ. विरुध्द सज्ज राहून महाराष्ट्र दारुबंदी कायदा, 1949 अन्वये फौजदारी गुन्हे दाखल करुन त्याचे उच्चाटन व नियंत्रणाचे कामकाज करीत आहे.

अवैध मद्यनिर्मिती, वाहतूक व विक्री विरुद्ध तक्रार स्वीकारण्याकरिता राज्य उत्पादन शुल्क विभागाचा नियंत्रण कक्ष 24 तास कार्यरत असून तक्रारदार तक्रार नोंदवू शकतात. तक्रार करणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येणार असून तक्रार नोंदविण्यासाठी 18002339999 हा टोल फ्री क्रमांक, 022-22660152 या दूरध्वनी क्रमांकावर अथवा 8422001133 या व्हॉट्सअॅप क्रमांकावर संपर्क साधावा, त्याचप्रमाणे [email protected] या ईमेलवर संपर्क करावा, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाने कळविले आहे.

०००

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.