महाराष्ट्राची स्वप्नपूर्ती
नागपूरला मुंबईशी थेट जोडणाऱ्या ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गा’च्या नागपूर ते शिर्डी या महामार्गाचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवार 11 डिसेंबर रोजी नागपूरात होत आहे. त्यानिमित्ताने हा विशेष लेख…
२५ वर्षांपूर्वी, चार वर्षांसाठी महाराष्ट्राचे आणि आता गेली आठ वर्षे देशाचे रस्ते मंत्रालय समर्थपणे सांभाळणारे देशाचे लोकप्रिय वाहतूक मंत्री नितीन गडकरी नेहमी सांगत असतात- “अमेरिका श्रीमंत आहे म्हणून त्यांच्याकडील रस्ते चांगले आहेत, असे नाही. तर, त्यांचे रस्ते चांगले असल्यामुळे तो देश श्रीमंत झाला आहे. कारण, रस्ते या रक्तवाहिन्या आहेत आणि प्रगतीचा मार्ग त्यातूनच जात असतो.”
हे खरेही आहे. रस्ते जेवढे चांगले, तेवढी वाहतूक सुकर आणि त्यातून सर्वच गोष्टी कमी वेळात होऊन प्रगतीचा वेग वाढण्याला मदत होते. अमेरिकेतील रस्ते चांगले तर आहेतच; पण मैलोगणती सरळही आहेत. त्यामुळे आवागमन खूपच सोयीचे होते, हे उघड आहे. आपल्या देशाची भौगोलिक रचना मात्र इतकी ‘सरळ’ नाही. उलट, वळणदार रस्ते, ही आपली बहुतांश ठिकाणी गरज आहे. पण, ते रस्तेसुद्धा चांगले असणे आवश्यक आहेच.
रस्ते विकास प्राधान्य
राष्ट्रीय स्तरावर याचा विचार गंभीरपणे पहिल्यांदा केला गेला प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी (1999-2004) यांच्या काळात. त्यानंतरच सुवर्ण चतुष्कोन योजना, राष्ट्रीय आणि राज्य महामार्ग प्रकल्प, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना आदींमुळे रस्त्यांचे भाग्य उजळण्याला मोठ्या प्रमाणावर गती मिळाली.
तेव्हापासून आजपर्यंतच्या वीस-बावीस वर्षांमध्ये देशभरात चांगल्या रस्त्यांचे फार मोठे जाळे तयार झाल्याचे आपण पाहतो. त्याचा लाभ कोरोनाच्या संकटकाळात खूप मोठ्या प्रमाणावर झाला, हेही आपण अनुभवले आहे. 2014 ते 2019 याकाळात केंद्रात गडकरी आणि महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असे दोन वैदर्भीय नेते प्रमुख स्थानी असल्यामुळे विदर्भातील रस्त्यांचे भाग्यच फळफळले, हेही नाकारता येणार नाही. त्याचाच लाभ म्हणजे नागपूर-मुंबई द्रुतगती समृद्धी महामार्ग होय, असे म्हणणे अतिशयोक्तीचे ठरणार नाही.
तत्कालीन फडणवीस सरकारने रस्ते विकासाला प्राधान्य देऊन अनेक योजना आखल्या. तत्कालीन सार्वजनिक बांधकाम (उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे यांनी त्या पूर्णत्वाला नेण्याची जबाबदारी घेतली. त्यातीलच सर्वाधिक महत्त्वाकांक्षी योजना म्हणजे समृद्धी महामार्ग होय. 701 किलोमीटर लांबीचा हा सलग महामार्ग 10 जिल्ह्यांमधील 26 तालुक्यांमधून जाताना 392 गावांना स्पर्श करणार आहे. या महामार्गावरून होणाऱ्या प्रवासाला पूर्वीपेक्षा सात ते आठ तास (म्हणजे जवळजवळ अर्धा वेळ) कमी लागतील, असा हिशोब मांडण्यात आला आहे. यामुळे सर्वच व्यवहारांमध्ये कितीतरी मोठा फरक पडेल, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. मुख्य म्हणजे वेळेची मोठी बचत होणार आहे. श्रम आणि खर्च यातही काही प्रमाणात कपात होईल.
विकासाचा मूलमंत्र
कोरोनाचा प्रादुर्भाव उद्भवला नसता तर आतापर्यंत हा महामार्ग सुरू होऊन त्याचे लाभ मिळायला लागले असते. 2020 अखेरीला काम पूर्ण करण्याचे मूळ नियोजन होते. कोरोनामुळे ते दोन-अडीच वर्षे पुढे ढकलावे लागले. उशीर झाला असला तरी ‘देर आए, दुरस्त आए’ असे म्हणता येईल.
पहिल्या टप्प्यातील नागपूर ते सेलूबाजार (वाशीम) हे 210 कि. मी. चे काम यावर्षीच्या प्रारंभी पूर्ण झाले. त्यांनतर वाशिम ते शिर्डी (292 कि. मी.) हा दुसरा टप्पासुद्धा पूर्ण झाला. त्यामुळेच आता दोन्ही टप्प्यांचे एकत्रित उद्घाटन प्रधानमंत्र्यांच्या हस्ते केले जात आहे. तिसरा टप्पा शिर्डी ते मुंबई (प्रत्यक्षात शहापूर) 2023 च्या मध्यापर्यंत, फारतर त्या वर्षाच्या अखेरीपर्यंत पूर्ण होऊन हा संपूर्ण महामार्ग धावायला लागेल ! याचा अर्थ, संकल्पनेपासून (2016) अवघ्या सात वर्षात महाराष्ट्राचा एक अत्यंत महत्त्वाकांक्षी विकास प्रकल्प पूर्णत्वास जाईल, ही अभिमान बाळगण्यासारखीच कामगिरी म्हणावी लागेल. या महामार्गामुळे समृद्धीचे मोठे दालनच खुले होणार आहे. त्याचा थेट लाभ 10 जिल्ह्यांना, तर अप्रत्यक्ष लाभ आणखी 14 जिल्ह्यांना होणार आहे. म्हणजे, दोनतृतीयांश महाराष्ट्र यामुळे समृद्धीच्या मार्गावर धावू लागेल. विदर्भातील नागपूर, वर्धा, अमरावती, वाशिम, बुलढाणा हे पाच जिल्हे, मराठवाड्यातील जालना, संभाजीनगर हे दोन जिल्हे, खानदेशातील नाशिक, अहमदनगर हे दोन जिल्हे आणि कोकणचा ठाणे जिल्हा यांच्या बहुआयामी विकासात महामार्गाचे प्रत्यक्ष योगदान राहणार आहे.
महामार्ग आणि त्याच्या आजूबाजूला होणारे बांधकाम लक्षात घेऊन संपूर्ण परिसराच्या हरितीकरणावर भर देणे आवश्यकच होते. त्यानुसार रस्त्याच्या दुतर्फा बारा-तेरा लाख मोठी झाडे आणि रस्त्याच्या मधोमधही तेवढीच लहान झाडे-झुडपे लावून समृद्धी ई-वे ग्रीन कॉरिडॉर निर्माण करण्याचे ठरले आहे. यावर एक हजार कोटींचा खर्च करून पर्यावरणाचे संरक्षण केले जाईल.
मुख्य म्हणजे, 120 मीटर रुंद, सहा पदरी असा हा महामार्ग निर्वेध वाहतुकीला मोठी मदत करणारा ठरेल. 150 कि. मी. वेगाने वाहन हाकणे त्यावरून शक्य होईल. त्याचा खूप मोठा लाभ सर्व अंगांनी होऊ शकतो. कृषी समृद्धी नगरे परिसरातील शेतीला पूरक ठरतील. यानिमित्ताने 24 जिल्ह्यांमधील इतरही व्यवसायांना आपोआपच बरकत येईल. असा हा सर्वांगीण विकासाचा प्रकल्प आहे. त्यासाठी शेतजमीन देणारे शेतकरी, रस्ता बांधणारे तंत्रज्ञ-कामगार, देखरेख ठेवणारे अधिकारी-कर्मचारी या सर्वांनीच आपापली भूमिका इमाने-इतबारे निभावली तर दोनतृतीयांश महाराष्ट्रातील जनतेचे भविष्यात भले होऊ शकते. हा आपल्या सर्वांच्या समृद्धीचा महामार्ग आहे, ही भावना बाळगण्याची गरज आहे.
आता नागपूर-गोवा महामार्ग
समृद्धी महामार्ग सुरू होत असतानाच, नागपूर-संभाजीनगर-पुणे-गोवा या नवीन महामार्गाची कल्पना पुढे आली आहे. यात पश्चिम महाराष्ट्रही येणार असल्याने संपूर्ण राज्यच येत्या काही वर्षात वाहतुकीच्या दृष्टीने एकजिनसी होऊ शकते.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात बोलताना या नव्या महामार्गाचे सूतोवाच केले. ते म्हणाले की, विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र या तीन विभागांना जोडत हा महामार्ग गोव्यात जाईल. यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हे महत्त्वाच्या महामार्गांशी आणि उर्वरित राज्याशी जोडले जातील. परिणामी संपूर्ण महाराष्ट्रच महामार्गमय होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
विनोद देशमुख
(मो.- 9850587622)
ईमेल- vddeshmukh08 @gmail.com