महापारेषणच्या राज्य भार प्रेषण केंद्राला सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल दोन राष्ट्रीय पुरस्कार – महासंवाद
मुंबई, दि. 14 : विजेच्या उपलब्धतेनुसार पुरवठा व त्याचे नियंत्रण करण्यासाठी नावीन्यपूर्ण योजनांची यशस्वी अंमलबजावणी केल्याबद्दल महापारेषणच्या महाराष्ट्र राज्य भार प्रेषण केंद्र, ऐरोलीला देशातील सर्वोत्कृष्ट भार प्रेषण केंद्र व ओपन ऍक्सेस (एसएलडीसी) या दोन राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले. या पुरस्काराबद्दल महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार (भा.प्र.से.) यांनी अभिनंदन केले आहे.
इंडिपेंडेन्ट पॉवर प्रोड्युसर्स असोसिएशन ऑफ इंडिया (आयपीपीएआय) या राष्ट्रीय संस्थेने बेळगावमध्ये हा पुरस्कार सोहळा आयोजित केला होता. देशभरातील विद्युत कंपन्यांच्या कामगिरीचे मूल्यमापन करून हे पुरस्कार दिले.
याप्रसंगी केंद्रीय विद्युत प्राधिकरणचे अध्यक्ष घनश्याम प्रसाद, महाराष्ट्र राज्य विद्युत नियामक आयोगाचे माजी अध्यक्ष व्ही. राजा, केंद्रीय विद्युत प्राधिकरणचे माजी अध्यक्ष राकेशनाथ, ग्रीड इंडियाचे माजी व्यवस्थापकीय संचालक एस के. सोनी यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण झाले. या वेळी महाराष्ट्र राज्य भार प्रेषण केंद्र, ऐरोलीचे अधीक्षक अभियंता मिलिंद देवळे, उमेश भगत, उपमहाव्यवस्थापक नितीन पौनीकर, सहाय्यक महाव्यवस्थापक (वित्त व लेखा) आनंद दळवी, कार्यकारी अभियंता दिनेश पाटील, व्यवस्थापक (मानव संसाधन) योगेश अघोर, सहाय्यक अभियंता विजय कांबळे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
या पुरस्कारासाठी महाराष्ट्र राज्य भार प्रेषण केंद्राचे कार्यकारी संचालक शशांक जेवळीकर, मुख्य अभियंता गिरीश पंतोजी यांचे मार्गदर्शन लाभले.
००००
संजय ओरके/विसंअ/