‘टाटा मुंबई आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन’ म्हणजे सलोखा, एकता, संस्कृती आणि विविधतेचा उत्सव – क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे – महासंवाद
मुंबई, दि. १४ : टाटा मुंबई आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा म्हणजे सलोखा, एकता, संस्कृती आणि विविधतेचा उत्सव आहे. आपण सर्वजण मिळून १९ जानेवारी रोजी ही मॅरेथॉन स्पर्धा यशस्वी करुया, असे आवाहन क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल येथील व्हिविंग गॅलरी येथे टाटा मुंबई आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेच्या रिंगिंग बेल कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री आणि आमदार छगन भुजबळ, क्रीडा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अनिल डिग्गीकर यांच्यासह या स्पर्धेचे आयोजक विवेक सिंग, उज्ज्वल माथूर, टी नारायण, प्रायोजकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
मंत्री श्री. भरणे म्हणाले, ही स्पर्धा होण्यासाठी रिगिंग बेल वाजल्यापासून ४ दिवस १० तास ५० मिनिटे राहीले आहे. म्हणजे काऊंट डाऊन सुरू झाले आहे. जगातील प्रमुख दहा आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धापैकी टाटा मुंबई मॅरेथॉन ही एक प्रमुख स्पर्धा आहे. देशातीलच नव्हे तर आशिया खंडातील सर्वाधिक बक्षीस रक्कम असणारी आणि सर्वाधिक स्पर्धक असणारी ही मॅरेथॉन स्पर्धा असून या स्पेर्धेचा नावलौकीक आहे.
टाटा मुंबई मॅरेथॉन ही मुंबई आणि महाराष्ट्राचा अभिमान आहे आणि देश विदेशातून ६०,००० हून अधिक धावपटूंचा सहभाग हे प्रेरणादायी आहे. टाटा, आयडीएफसी फर्स्ट बैंक, आणि टीसीएस यांसारख्या प्रायोजकांच्या समर्पण, दृढनिश्चय, आणि उत्साहाने भारताला धावण्याच्या जागतिक नकाशावर स्थान दिले आहे. ब्रिटनचे मो फराह, सर्वात यशस्वी ट्रॅक अॅथलीट्सपैकी एक, यंदा आंतरराष्ट्रीय इव्हेंट अॅम्बेसेडर आहेत, त्यांची उपस्थिती हा नामवंत धावपटू आणि हौशी धावपटूंना प्रेरणा देणारा ठरेल असे मंत्री श्री. भरणे सांगितले.
यावेळी माजी मंत्री आणि आमदार श्री. भुजबळ यांनी मनोगत व्यक्त केले.
जगभरामध्ये बेल वाजवून कोणत्याही चांगल्या कार्यक्रमाची सुरुवात करण्याची पद्धत आहे. टाटा मुंबई आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनच्या ऐतिहासिक पर्वाच्या उत्सवाला आज प्रारंभ झाला आहे, असेही त्यांनी सांगितले.
००००
राजू धोत्रे/विसंअ/