आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून महसूल वाढविण्यावर भर द्यावा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद

0 3

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून महसूल वाढविण्यावर भर द्यावा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद

मुंबई, दि. ८ : राज्य उत्पादन शुल्क विभाग हा शासनाला महसूल मिळवून देणारा महत्वाचा विभाग आहे. महसूल वाढविण्यासाठी विभागाने नवनवीन संकल्पना अंमलात आणून आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने महसूल वाढवण्यावर भर द्यावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

सह्याद्री अतिथीगृह येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पुढील १०० दिवस आराखड्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी आढावा घेतला.

या बैठकीस महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ, सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, महसूल राज्यमंत्री योगेश कदम, मुख्य सचिव सुजाता सौनिक यांची प्रमुख उपस्थित होती.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, या विभागातील सेवा हमी कायद्यांतर्गत सुचित केलेल्या १३४ सेवा पैकी ६२ सेवा कार्यान्वित असून उर्वरित ७२ सेवा ऑनलाइन करण्यात येणार आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विविध कार्यप्रणालीमध्ये अत्याधुनिक साधनसामुग्रीचा वापर करण्यात यावा. मद्यार्क वाहतूक करणाऱ्या वाहनावर डिजिटल लॉक बसविण्याची कार्यवाही करावी. तसेच गुन्हेगारांना वचक बसावा या पद्धतीने कार्यप्रणाली आखण्यात यावी. अवैधरित्या मद्य निर्मिती, वाहतूक व विक्रीला आळा घालण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशा सूचना मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी यावेळी दिल्या.

याप्रसंगी अपर मुख्य सचिव (नियोजन) राजगोपाल देवरा, अपर मुख्य सचिव (वित्त) ओ.पी.गुप्ता, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेशकुमार,  मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, प्रधान सचिव अश्विनी भिडे, सचिव डॉ.श्रीकर परदेशी आदी उपस्थित होते.

****

शैलजा पाटील/विसंअ/

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.