कॅन्सर उपचारातील प्रगत जनुक सुधारित सेल थेरपी जीएसटीच्या कक्षेबाहेर – महासंवाद

0 2




कॅन्सर उपचारातील प्रगत जनुक सुधारित सेल थेरपी जीएसटीच्या कक्षेबाहेर – महासंवाद

मुंबई, दि. २१: रक्ताच्या कर्करोगाच्या उपचारासाठी आयआयटी मुंबई आणि टाटा कॅन्सर रुग्णालयाने विकसित केलेली प्रगत जनुक सुधारित सेल थेरपी वस्तू व सेवा कराच्या कक्षेतून वगळण्याचा निर्णय आज झालेल्या वस्तू व सेवा कर परिषदेत घेण्यात आला असल्याची माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.

वस्तू व सेवा कर परिषदेची ५५ वी बैठक दि. २१ – २२ डिसेंबर २०२४ रोजी जैसलमेर, राजस्थान येथे आयोजित करण्यात आली आहे. केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली सुरु असलेल्या या परिषदेत देशभरातील सर्व राज्यांचे अर्थमंत्री, मंत्री  सहभागी झाले आहेत. या परिषदेत महाराष्ट्र शासनाचे प्रतिनिधीत्व मंत्री कु. तटकरे करत आहेत.

याविषयी बोलताना मंत्री कु. तटकरे म्हणाल्या, कर्करोगावर उपचार घेणाऱ्या रुग्णांना शारीरिक, मानसिक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यातच उपचारातील औषधांचा तसेच विविध पद्धतींचा आर्थिक भार मोठा असतो. आयआयटी मुंबई आणि टाटा कॅन्सर रुग्णालयाने संयुक्तरित्या विकसित केलेली प्रगत जनुक सुधारित सेल थेरपी जीएसटीमधून वगळण्याचा निर्णय आज घेण्यात आला आहे. रक्ताचा  कॅन्सर बळावलेला असलेल्या टप्प्यांत रुग्णांच्या वैद्यकीय उपचारासाठी ही थेरपी वापरण्यात येते. आजच्या या निर्णयामुळे या थेरपीद्वारे उपचार घेणाऱ्या रुग्णांना दिलासा मिळणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनातून महाराष्ट्र राज्याच्या वतीने विविध विषयांवरील सुधारणा, बदलांबाबत या परिषदेत मुद्दे उपस्थित करण्यात आले आहेत. आरोग्य सुविधा आणि सुलभ उपचाराच्या दृष्टीने कर्करोगाच्या उपचारासाठी असलेली थेरपी कराच्या कक्षातून वगळण्याची विनंती करण्यात आली होती, त्यास परिषदेने मान्यता दिली असल्याचे त्यांनी सांगितले.

०००







Source link

Leave A Reply

Your email address will not be published.