डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांना ‘निलिमाराणी साहित्य सन्मान २०२५’ जाहीर
ओडिशा राज्याच्या भुवनेश्वर येथील कादंबिनी साहित्य अकादमीच्या वतीने देण्यात येणारा प्रतिष्ठित ‘निलिमाराणी साहित्य सन्मान 2025’ महाराष्ट्र कॅडरचे भारतीय परराष्ट्र सेवेतील निवृत्त वरिष्ठ अधिकारी, लेखक, आणि साहित्यिक डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांना आज जाहीर झाला.
दिल्लीतील इंडिया इंटरनॅशनल सेंटर येथे साहित्य अकादमीतर्फे आयोजित कार्यक्रमात या पुरस्काराची घोषणा करण्यात आली. कादंबिनी साहित्य अकादमीच्या वतीने देण्यात येणारा हा पुरस्कार भारतीय साहित्य, कला, आणि संस्कृतीतील उत्कृष्ट योगदानासाठी दिला जातो.
डॉ. मुळे यांनी परराष्ट्र सेवेत रशिया, जपान, सिरिया, मालदीव, आणि अमेरिका या देशांमध्ये महत्त्वाच्या पदांवर सेवा बजावली आहे. त्यांचे साहित्यिक व सामाजिक योगदानही लक्षणीय असून, मराठी तरुणांना भारतीय प्रशासकीय सेवेकडे वळवण्यासाठी ‘पुढचे पाऊल’ ही चळवळ उभारण्यामध्ये त्यांचा महत्त्वाचा वाटा राहिलेला आहे.
‘निलिमाराणी साहित्य सन्मान’ अंतर्गत रुपये 10 लाखांची रोख रक्कम, शुद्ध चांदीची स्मृतिचिन्ह, आणि प्रशस्तिपत्र प्रदान केले जाते. यापूर्वी हा प्रतिष्ठित पुरस्कार पद्मश्री प्रो. मनोज दास, अनुराधा रॉय, प्रख्यात साहित्यिक नामिता गोखले आणि मृदुला गर्ग यांना देण्यात आला आहे.
ओडिशातील सुप्रसिद्ध लेखिका डॉ.इतिराणी सामंता आणि त्यांच्या बंधू अच्युत सामंत यांच्या मातोश्रींच्या स्मृतिप्रित्यर्थ हा पुरस्कार 2019 पासून सुरू करण्यात आला आहे. अकादमीतर्फे दरवर्षी जानेवारी महिन्याच्या पहिल्या रविवारी ओडिशात साहित्य संमेलनाचे आयोजन केले जाते. 05 जानेवारी 2025 रोजी भुवनेश्वर येथे आयेाजित संमेलनात डॉ. ज्ञानेश्वर मुळेना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती डॉ. इतिरानी सामंता यांनी दिली.
0000