ध्वजनिधीला सर्वांचे योगदान गरजेचे – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन – महासंवाद

0 4

ध्वजनिधीला सर्वांचे योगदान गरजेचे – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन – महासंवाद

मुंबई, दि. 7 : देशाच्या सीमेवर सैन्यदलाच्या जवानांच्या जागत्या पहाऱ्यामुळे देशातील नागरिक सुखाने राहू शकतात व देश प्रगती करू शकतो.  ही जाणीव ठेवून प्रत्येकाने सशस्त्र सैन्यदल ध्वजनिधीला आपले योगदान दिले पाहिजे, असे प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केले.  देशातील प्रत्येकाने मतभेद विसरून एकदिलाने काम केल्यास सन २०४७ पर्यंत भारत विकसित राष्ट्र म्हणून उदयास येईल असा विश्वास राज्यपालांनी व्यक्त केला.

सशस्त्र सेना ध्वज दिनाच्या ७५ व्या (अमृतमहोत्सवी) वर्धापन दिनानिमित्त राज्यपाल राधाकृष्णन यांनी मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातर्फे आयोजित सशस्त्र सेना ध्वज निधी संकलन मोहिमेचा शनिवारी (दि. ७) राजभवन मुंबई येथे आरंभ केला, त्यावेळी ते बोलत होते.

सैनिक कल्याण विभागाचे संचालक कर्नल (नि.) दीपक ठोंगे यांनी राज्यपालांच्या परिधानाला सैन्य दलाच्या ध्वजाची प्रतिकृती लावली व राज्यपालांनी ध्वजनिधीला आपले योगदान दिले.

महाराष्ट्र  छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांसारख्या शूरवीर योद्ध्यांची भूमी आहे.  आपली ही सैन्यदले हा वारसा सांभाळत देशाचे रक्षण करीत आहेत.  आपल्या सैन्यदलांनी जशी कारगिल, डोकलाम येथे कठीण परिस्थितीत कामगिरी केली आहे, तशीच कामगिरी त्यांनी  नैसर्गिक संकट व पूरस्थितीच्या वेळी देखील पार पाडली आहे, असे राज्यपालांनी सांगितले.

आज भारत जगातील तिसरी महासत्ता होण्याकडे वाटचाल करित आहे, असे सांगून अमेरिकन दूतावासासमोर ज्याप्रमाणे आज लोकांच्या रांगा दिसतात, तश्या रांगा भारतीय दूतावासापुढे लागलेल्या दिसाव्या असे आपले स्वप्न असल्याचे राज्यपालांनी सांगितले.

यावेळी गेल्या वर्षभरात ध्वज निधी संकलनाच्या कार्यात उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल राज्यपालांच्या हस्ते विविध शासकीय व निमशासकीय संस्थांच्या प्रमुखांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अनेक संस्थांनी तसेच व्यक्तींनी ध्वजनिधीला आपले योगदान दिले.

कोकणचे विभागीय आयुक्त राजेश देशमुख, नाशिकचे विभागीय आयुक्त डॉ प्रवीण गेडाम, नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर, मुंबईचे जिल्हाधिकारी संजय यादव, यवतमाळचे जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया आदींना यावेळी स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाला नौदलाच्या पश्चिम मुख्यालयाचे मुख्य ध्वज अधिकारी व्हाईस ऍडमिरल संजय जे सिंह, प्रधान सचिव अंशू सिन्हा, मेजर जनरल बिक्रमदीप सिंह, एअर व्हाईस मार्शल रजत मोहन, कर्नल दीपक संचालक, सैनिक कल्याण विभाग आदी उपस्थित होते.

हौतात्म्य प्राप्त झालेल्या वीर जवानांच्या कुटुंबियांच्या कल्याणासाठी, त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी तसेच सेवानिवृत्त जवानांच्या पुनर्वसनासाठी ध्वजनिधीचा विनियोग केला जातो.

००००

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.