मॅरेथॉन दौडद्वारे केली मतदार जनजागृती; जिल्हाधिकाऱ्यांचा सहभाग – महासंवाद
छत्रपती संभाजीनगर, दि.१४(जिमाका): १०८-औरंगाबाद (पश्चिम) मध्ये मतदार जनजागृतीसाठी मॅरेथॉन रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी हे स्वतः या रॅलीत सहभागी झाले.
१०८-औरंगाबाद (पश्चिम) विधानसभा मतदार संघात मतदार जनजागृतीसाठी सकाळी ८ वा. क्रांती चौकातून मॅरेथॉन दौड सुरु झाली. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून या दौडची सुरुवात करण्यात आली.
उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके, उपजिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी उमाकांत पारधी, उपायुक्त मनपा अंकुश पांढरे, उपसंचालक आपत्ती व्यवस्थापन स्वप्नील सरदार, सहसंचालक तंत्रशिक्षण अक्षय जोशी, शिक्षणाधिकारी अश्विनी लाटकर व गटशिक्षणाधिकारी तथा स्विप नोडल अधिकारी दीपाली थावरे यांची यावेळी उपस्थिती होती.
सहभागी धावपटू व विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविण्यासाठी जिल्हाधिकारी व सर्व उपस्थित मान्यवरांनी मॅरेथॉन मध्ये सहभागी होऊन धावण्यास सुरवात केली. ‘मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो’, ‘माझे मत माझा अभिमान’, ‘आपले अमूल्य मत-करेल लोकशाही मजबूत’ अशा घोषणा देत मतदान जनजागृती करत मोठ्या संख्येने सहभागी झाले. या रॅलीमध्ये एमआयटी, देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालय, हायटेक महाविद्यालय,छत्रपती शाहू महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय, श्रेयस अभियांत्रिकी महाविद्यालय आदी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या आयोजनासाठी देवगिरी महाविद्यालयातील एनसीसी व रासेयो विद्यार्थ्यांनी विशेष सहकार्य केले. सूत्रसंचालन प्रविण लोहाडे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहाय्यक नोडल अधिकारी मनोज बिरुडे, गोविंद उगले, साहेबराव धनराज,अनंत कणगारे,परसराम बाचेवाड, तुकाराम वांढरे आदींनी परिश्रम घेतले. देवगिरी महाविद्यालयाच्या प्रांगणात या दौडचा समारोप झाला.
०००