लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान करा – जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर – महासंवाद
धुळे, दि. ११ (जिमाका): महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात येत्या 20 नोव्हेंबर, 2024 रोजी मतदान होत आहे. या दिवशी नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने घराबाहेर पडून लोकशाही बळकटी करणासाठी मोठ्या संख्येने मतदान करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज आमळी येथे चित्रप्रदर्शन उद्धाटन प्रसंगी केले.
भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालय, केंद्रीय संचार ब्युरो, जळगाव आणि जिल्हा निवडणुक अधिकारी, धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने विधानसभा निवडणूक 2024 मतदान जनजागृती मल्टीमिडीया चित्रप्रदर्शनाचे उद्धाटन आज साक्री तालुक्यातील आमळी येथे जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांच्या हस्ते पार पडले, यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास सहायक जिल्हाधिकारी डी. सर्वानंद, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, अपर तहसिलदार दत्ता शेजुळ, सहायक पोलीस निरीक्षक किरण बर्गे, माहिती व प्रसारण विभागाचे सहायक प्रचार अधिकारी विकास तापकीर, तलाठी कंचन पवार, कन्हैयालाल ट्रस्टचे अध्यक्ष किरण दहिते आदींसह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी व नागरीक उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री.पापळकर म्हणाले की, भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालय, केंद्रीय संचार ब्युरो, जळगाव आणि जिल्हा निवडणुक अधिकारी, धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने मतदान जनजागृती मल्टीमिडीया चित्रप्रदर्शनाचे उद्धाटन आज होत असून या मतदान जनजागृती प्रदर्शनाचा येथील नागरिक लाभ घेऊन त्याचा मतदानाचा टक्का वाढण्यासाठी निश्चित मदत होईल. येत्या 20 नोव्हेंबर रोजी सकाळी 7 वाजेपासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत नागरिकांना मतदान करता येणार आहे. या मतदानाच्या उत्सवात सर्वांनी आवर्जुन सहभागी होऊन आपली लोकशाही भक्कम करण्यासाठी प्रयत्न करावा. तसेच, आपल्या परिसरातील नातेवाईक कामानिमित्त जर बाहेरगावी गेले असतील तर त्यांना मतदानाच्या दिवशी बोलावून मतदानाचा हक्क बजावण्यासाठी प्रेरित करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
प्रारंभी जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्धाटन केले. यावेळी येथे मांडण्यात आलेल्या प्रदर्शनाची मान्यवरांनी पाहणी केली. यावेळी आप की जय बहुउद्देशीय संस्था, अंमलपाडा, जि.नंदुरबार यांनी पथनाट्याद्वारे जनजागृती कार्यक्रमाचे सादरीकरण केले. हे प्रदर्शन तीन दिवस नागरीकांसाठी खुले राहणार आहे. याचा आमळी येथे यात्रेनिमित्त येणाऱ्या नागरीकांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक तसेच बाहेर गावाहून आलेले नागरीक उपस्थित होते.
०००