मतदार जनजागृतीसाठी फिरत्या वाहनाद्वारे प्रचार शुभारंभ व बाईक फेरी – महासंवाद
नंदुरबार, दि. ११ (जिमाका): विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 अंतर्गत मतदान जनजागृती (SVEEP) उपक्रमासाठी केंद्रीय संचार ब्युरो, पुणे आणि भारत निवडणूक आयोगामार्फत मतदान जनजागृतीसाठी पाठविण्यात आलेल्या डीजिटल व्हॅन व बाईक रॅलीच शुभारंभ जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. मिताली सेठी यांच्या हस्ते नंदुरबार शहरात करण्यात आला.
कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावन कुमार, नंदुरबार विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी अंजली शर्मा, उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रमोद भामरे, माध्यमिक उपशिक्षणाधिकारी डॉ. युनूस पठाण, भावेश सोनवणे, गटशिक्षणाधिकारी निलेश पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी जयंत चौरे, शरद पाटील, सचिन गोसावी, नंदुरबार तालुक्याचे सर्व केंद्रप्रमुख, नंदुरबार तालुक्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचे प्राचार्य, मुख्याध्यापक तसेच नंदुरबार तालुक्याच्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांचे सर्व मुख्याध्यापक व शिक्षक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार येथून रॅलीस सुरुवात होऊन नवापूर चौफुली- धुळे चौफुली- श्रॉफ हायस्कुल-छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदीर-अंधारे चौक- नगरपालिका-नेहरू पुतळा-गांधी पुतळा- उड्डाण पूल-सिंधी कॉलनी या मार्गाने रॅलीचे आयोजन होऊन शहरातील एस.ए.मिशन इंग्लिश मिडीयम स्कूलच्या प्रांगणात रॅलीचा समारोप करण्यात आला.
रॅलीचा शुभारंभ SVEEP चा झेंडा तसेच हिरवा झेंडा दाखवून जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी आणि नोडल अधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी सावन कुमार यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी महाराष्ट्राच्या केंद्रीय संचार ब्युरो, पुणे आणि भारत निवडणूक आयोगामार्फत मतदान जनजागृतीसाठी पाठविण्यात आलेल्या डीजिटल व्हॅनला देखील हिरवी झंडी दाखवून शुभारंभ करण्यात आला. ही व्हॅन नंदुरबार जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदार संघात मतदार जागृतीचे उपक्रम राबविणार आहे. रॅलीच्या समारोप प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते निवडणुकीचे घोषवाक्य लावलेले फुगे हवेत सोडून मतदान जागृतीचा संदेश देण्यात आला. या प्रसंगी विद्यार्थ्यांमार्फत पथनाट्य, निवडणूक गीत तसेच फ्लॅश मॉब अंतर्गत निवडणुकीच्या गाण्यावर नृत्य सादर करण्यात आले. समारोप प्रसंगी उपस्थितांना मतदानाची शपथ देऊन रॅलीची सांगता करण्यात आली.
०००