मतदान केंद्रांवर पुरेशा सुविधा पुरवाव्यात -उप निवडणूक आयुक्त हिरदेश कुमार – महासंवाद

0 3

मतदान केंद्रांवर पुरेशा सुविधा पुरवाव्यात -उप निवडणूक आयुक्त हिरदेश कुमार – महासंवाद

मुंबई, दि. ८ : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रत्येक मतदान केंद्रांवर मतदारांना किमान आश्वासित सुविधा योग्यरित्या पुरविल्या जातील, यासाठी योग्य व्यवस्थापन करावे, असे निर्देश भारत निवडणूक आयोगाचे उप निवडणूक आयुक्त हिरदेश कुमार यांनी आज कोंकण व नाशिक विभागातील निवडणूक यंत्रणांना दिले.

सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित कोकण व नाशिक विभागांतर्गत सर्व जिल्ह्यांतील विधानसभा मतदारसंघांमधील निवडणूक पूर्वतयारीबाबत आढावा बैठकीत ते बोलत होते.

या बैठकीस भारत निवडणूक आयोगाचे उप निवडणूक आयुक्त संजय कुमार, प्रधान सचिव अविनाश कुमार, राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम, भारत निवडणूक आयोगाचे उपसचिव सुमनकुमार, अवर सचिव अनिलकुमार, राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी पी. प्रदीप, बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा जिल्हा निवडणूक अधिकारी भूषण गगराणी, कोकण विभागीय आयुक्त डॉ. राजेश देशमुख, नाशिक विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, कोकण व नाशिक विभागातील सर्व जिल्हाधिकारी यांच्यासह मुंबई शहर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघासाठी नियुक्त केंद्रीय निवडणूक निरीक्षक (सर्वसाधारण)  सत्यप्रकाश टी. एल., हिमांशू गुप्ता, समीर वर्मा, अंजना एम.,शिल्पा शिंदे, केंद्रीय निवडणूक पोलीस निरीक्षक पोनुगुंतला रामजी, केंद्रीय खर्च निरीक्षक विजय बाबू वसंता, अमन प्रीत आदी उपस्थित होते.

श्री. हिरदेश कुमार म्हणाले की, मतदान केंद्रावर पुरेशी सुरक्षा व्यवस्था, तात्पुरत्या मतदान केंद्रांची मान्यता घेणे, मतदान केंद्राचे ठिकाण बदलले असल्यास त्याबाबत मतदारांपर्यंत माहिती पोहोचविणे, त्याची प्रसिद्धी करणे, महिलांनी, दिव्यांग कर्मचाऱ्यांनी संचलित केलेले अशा प्रकारच्या विशेष मतदान केंद्रांची निर्मिती करणे, मतदान केंद्रांवर पिण्याचे पाणी,  रॅम्प,  सावली इ. सुविधांची निर्मिती, वेब कॅमेरे व सीसीटीव्ही कॅमेरे लावून मतदान केंद्रांचे वेबकास्टिंग करणे, मतदान केंद्राच्या बाहेर व आत कॅमेरे लावावे, अशा सूचना दिल्या. तसेच या सर्व सुविधांची पूर्तता झाल्याबाबत व आवश्यकतांबाबत स्वतः जिल्हा निवडणूक अधिकारी, पोलीस अधीक्षक, पोलीस आयुक्त यांनी स्वतः पाहणी करुन खातरजमा करावी, अशा सूचनाही त्यांनी केल्या.

यंदा मतदान हे नोव्हेंबर महिन्यात असून आता सूर्यास्त लवकर होईल, अशा वेळी सायंकाळी मतदान केंद्रांवर पुरेशा प्रकाशासाठी दिवे लावण्याची सुविधा करावी. टपाली मतदान व गृह मतदान प्रक्रियेबाबतही यंत्रणांनी पूर्ण प्रक्रिया व्यवस्थित राबवावी. गृह मतदान कार्यक्रम अगोदर जाहीर करावा. त्याबाबत उमेदवारांना कळवावे. प्रत्येक मतदारापर्यंत मतदान चिठ्ठ्या वेळत पोहोचतील याचे नियोजन करावे. मतदार याद्यांविषयी असलेल्या तक्रारींबाबत तत्काळ दखल घ्यावी. मतदान केंद्रांबाबतही सर्व यंत्रणांनी खबरदारी घ्यावी. विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी विशेष प्रयत्न करावेत; या दृष्टीने स्वीप अंतर्गत मतदार जनजागृती उपक्रमांवर भर द्यावा, दहा हजारांहून अधिक मतदार केंद्रांच्या ठिकाणी प्रतीक्षा कक्ष तयार करावा, अशाही सूचना श्री. कुमार यांनी दिल्या.

शहरी भागात मतदानाच्या टक्केवारीत वाढ होण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करावेत, असे सांगून हिरदेश कुमार म्हणाले, मतदारांना आपल्या मतदान केंद्राची माहिती व्हावी यासाठी सर्व साधनांचा अवलंब करावा. मतदार चिठ्ठ्यांचे 100 टक्के आणि वेळेत वाटप करावे. सर्व जिल्ह्यात ‘आपले मतदान केंद्र जाणून घ्या- नो युवर पोलींग स्टेशन’ उपक्रम चांगल्या प्रकारे राबविला जात असून त्याप्रमाणे विभागातील इतर जिल्ह्यातही राबविला जावा. मतदारांना मोबाईल ॲपद्वारे मतदान केंद्रांची माहिती कशा प्रकारे पहावी याबाबत प्रचार प्रसिद्धी करावी.

प्रत्येक विधानसभा क्षेत्रात निवडणूक निर्णय अधिकारी यांनाच सर्व प्रक्रिया राबवावयाची आहे. राबवित असलेल्या निवडणूक विषयक कामकाजाबाबत प्रत्येक टप्प्यावर राजकीय पक्ष, उमेदवार यांच्या प्रतिनिधींना माहिती द्यावी व प्रक्रिया राबवावी. त्याचे दस्तऐवजीकरण करावे. त्यांचे शंकानिरसन करावे. निवडणूक प्रक्रिया राबवितांना पारदर्शकतेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे. निवडणूक काळात माध्यमांमध्ये येणाऱ्या बनावट बातम्या, फेक न्यूज अर्थात खोट्या माहितीचे प्रसारण तात्काळ रोखावे, असे त्यांनी सांगितले.

निवडणूक कामकाजासाठी लागणारे पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध असल्याची खात्री करावी. आवश्यकतेनुसार मनुष्यबळ उपलब्ध करुन घ्यावे. नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना जेवण, पिण्याचे पाणी, कामकाजाची सुविधा, मतदान केंद्रांवर गेल्यावर मुक्काम, मुक्कामाच्या ठिकाणी स्वच्छता, सुरक्षितता, भोजन, पाणी याबाबतची व्यवस्था पुरविण्यात यावी. निवडणूक कामकाजात कर्मचाऱ्यांना अचानक उद्भवणाऱ्या आजारांसाठी तत्काळ वैद्यकीय सेवा देण्याचे नियोजन असावे. त्यासाठी स्थानिक पातळीवर रुग्णालयांमध्ये खाटा राखीव ठेवाव्या. प्रत्येक निवडणूक कर्मचाऱ्याची योग्य काळजी घेतली जाईल, याची खबरदारी घ्यावी.

अचूक आकडेवारीसाठी स्वतंत्र नोडल अधिकारी

मतदानाचे प्रमाण नेमके कळावे व त्यातील आकडेवारीत अधिक अचूकता यावी यासाठी या निवडणुकीत झालेल्या मतदानाच्या टक्केवारीसाठी स्वतंत्र नोडल अधिकारी विधानसभा मतदार संघस्तरावर, जिल्हास्तरावर आणि राज्यस्तरावर नेमण्यात येणार आहे. बुथनिहाय पडताळणी करुन मतदान टक्केवारी अचूक देण्यात येईल यासाठी ही उपाययोजना करण्यात आल्याचेही निवडणूक उपायुक्त यांनी सांगितले.

श्री. संजय कुमार म्हणाले, पाच पेक्षा अधिक मतदान केंद्रे असलेल्या ठिकाणी अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करुन द्यावे. मतदानावेळी गर्दी होऊ नये यासाठी मतदारांच्या रांगाचे व्यवस्थापन करावे. निवडणूक प्रक्रियेची पारदर्शकता जपण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राजकीय पक्षांना सर्व टप्प्यांवर आवश्यक ती माहिती द्यावी.

राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्री. चोक्कलिंगम म्हणाले, महानगरपालिका क्षेत्रातील सर्व मतदान केंद्रांवर 100 टक्के सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, मतदान केंद्रांवर आवश्यक ते सर्व दिशादर्शक, ठिकाणदर्शक फलक असावेत. मतदारांना आपले मतदान केंद्र माहित असावे, यासाठी प्रयत्न करावेत. मतदानाच्या दिवशी आणि मतमोजणीच्या दिवशी भरावयाचे सर्व नमुने,  अहवाल व्यवस्थितरित्या भरुन वेळेत पोहोचतील आदी बाबींबाबत मतदान केंद्राध्यक्ष, मतदान केंद्र अधिकारी यांना व्यवस्थित प्रशिक्षण द्यावे. पाच पेक्षा अधिक मतदान केंद्रे असलेल्या इमारतीच्या ठिकाणी मतदारांना बसण्यासाठी बाकडे, खुर्च्या उपलब्ध करुन द्याव्यात. मतदानासाठी घरुन येण्यासाठी व जाण्यासाठी वाहनाची मागणी केलेल्या दिव्यांग तसेच ज्येष्ठ नागरिकांना ही सुविधा उपलब्ध करुन द्यावी, असेही ते म्हणाले.

उमेदवार, राजकीय पक्ष यांना निवडणूक प्रक्रियेची वेळोवेळी माहिती देऊन त्यामध्ये पारदर्शकता राहील याकडे लक्ष द्यावे. त्यांच्या सूचना घ्याव्यात, त्यांच्या तक्रारींचे वेळेत निराकरण होईल याची दक्षता घ्यावी, अशा सूचनाही श्री. चोक्कलिंगम यांनी दिल्या.

जिल्हा निवडणूक अधिकारी भूषण गगराणी यांनी सांगितले की, मुंबई शहर व उपनगर जिल्ह्यात मतदार चिठ्ठ्यांचे शंभर टक्के वितरण स्थलांतरित मतदारांना मतदानासाठी प्रवृत्त करण्याकरिता उपाययोजना,  एकाच इमारतीत पाचपेक्षा अधिक मतदान केंद्र असलेल्या ठिकाणी सर्व मतदान केंद्रांवर समसमान मतदारसंख्या असेल अशी रचना करण्यात आली आहे. मतदानावेळी रांगाच्या व्यवस्थापनासाठी क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी आवश्यक तेथे राखीव मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत, असेही ते म्हणाले.

बैठकीस कोकण व नाशिक विभागातील सर्व विधानसभा मतदारसंघांचे निवडणूक निरीक्षक, खर्च निरीक्षक तसेच पोलीस निवडणूक निरीक्षक, पोलिस आयुक्त, पोलिस अधीक्षक, मुंबई शहर जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदार संघांचे निवडणूक निर्णय अधिकारी, प्रत्यक्ष उपस्थित होते. इतर जिल्ह्यातील निवडणूक निरीक्षक यांच्यासह निवडणूक प्रशासनातील सर्व वरिष्ठ अधिकारी तसेच निवडणूक निर्णय अधिकारी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे उपस्थित होते.

०००

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.