निवडणुकीची प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडावी मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रयत्न करावा – विभागीय आयुक्त दिलीप गावडे – महासंवाद

0 3

निवडणुकीची प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडावी मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रयत्न करावा – विभागीय आयुक्त दिलीप गावडे – महासंवाद

परभणी, दि. 7 (जिमाका) – जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यासाठी जिल्हा व पोलीस प्रशासन तसेच संबधित नोडल अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दक्षता घ्यावी. तसेच मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी देखील प्रयत्न करावा, अशी सूचना विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी केली.

परभणी जिल्ह्यातील जिंतूर, परभणी, गंगाखेड, पाथरी विधानसभा मतदारसंघांतील निवडणूक तयारीचा आढावा विभागीय आयुक्त श्री. गावडे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत घेतला. बैठकीस जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतिषा माथुर, उपायुक्त अनंत गव्हाणे, अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, मनपा आयुक्त धैर्यशील जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी जनार्धन विधाते, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी खांडेकर यांच्यासह सर्व निवडणूक निर्णय अधिकारी, नोडल अधिकारी उपस्थित होते.

विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासनाने केलेल्या तयारीबाबत समाधान व्यक्त करुन विभागीय आयुक्त दिलीप गावडे म्हणाले की, मतदानाच्या दिवशी मतदारांना कुठल्या प्रकारे अडचणी जाणवू देऊ नयेत. मतदान केंद्रांवर आवश्यक त्या सुविधा उपलब्ध कराव्यात. मतदानाची टक्केवारी वाढविण्यावर अधिक भर द्यावा. स्वीप अंतर्गत मतदानाबाबत मोठया प्रमाणात जनजागृती करावी. पोस्टल मतदानाची प्रक्रिया काळजीपूर्वक पार पाडावी. उमेदवारांचे खर्च बारकाईने नोंदवावेत. उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींना मतदानाच्या संपूर्ण प्रक्रियेबाबत विशेषत: मतदान यंत्राबाबत अद्यावत माहिती द्यावी. निवडणूक काळात पोलीस प्रशासनाने बंदोबस्ताचे व्यवस्थित नियोजन करावे. कुठेही अनुचित प्रकार आढळल्यास तात्काळ कार्यवाई करावी. तपासणी पथकांनी दक्ष राहून तपासण्या कराव्यात. निवडणूक प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्वांनी समन्वयाने काम करावे.

जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज असून मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न केले जातील, असे यावेळी सांगितले. तर पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परेदशी यांनी बंदोबस्ताचे संपूर्ण नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यात कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही, याबाबत दक्षता घेतली जाईल, असे सांगितले.

उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्री. विधाते यांनी सादरीकरणाव्दारे निवडणूक कामकाजाबाबत यावेळी सविस्तर माहिती दिली.  प्रारंभी कलापथकामार्फत “मतदारांनो करा तुम्ही मतदान, लोकशाहीला बळकट करा” हे गीत सादर करण्यात आले. शेवटी सर्व उपस्थितांना मतदानाची प्रतिज्ञा देण्यात आली.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.