सातारा जिल्ह्यात नि:पक्षपाती व पारदर्शक निवडणुकांसाठी दक्षता घ्या -विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार – महासंवाद
सातारा दि. ०४: सातारा जिल्ह्यातील आठही मतदार संघात नि:पक्षपती व पारदर्शक निवडणुका होतील यासाठी त्याचबरोबर जिल्ह्यातील एकही पात्र मतदार मतदानापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात विधानसभेच्या अनुषंगाने विभागीय आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांनी आढावा घेतला. या आढावा बैठकीला जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलीस अधीक्षक समीर शेख, उपायुक्त समीक्षा केंद्राकार, अपर जिल्हाधिकारी तथा आचार संहिता कक्ष प्रमुख जीवन गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने यांच्याह नोडल अधिकारी उपस्थित होते.
निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणूक अधिकारी यांनी प्रत्येक मतदान केंद्रांना भेटी देवून तिथल्या सोयी-सुविधांची पहाणी करावी, असे निर्देश देवून विभागीय आयुक्त डॉ. पुलकुंडवार म्हणाले, मतदान केंद्रांवर पिण्याचे पाणी ठेवावे. हे पाणी देण्यासाठी व्यवस्था करावी. तसेच खुर्च्यांची व्यवस्था करावी. मतदान केंद्रावर पुरेशा प्रकाशाची व्यवस्था करावी.
मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी मतदान जागृतीचे जिल्हयात मोठया प्रमाणात कार्यक्रम घ्यावेत. यासाठी सर्व नोडल अधिकाऱ्यांबरोबर इतर शासकीय अधिकाऱ्यांची, कर्मचाऱ्यांची मदत घ्यावी. पोस्टल बॅलेटचे व्यवस्थीत नियोजन करावे. निवडणूक आयोग जिल्ह्यातील मतदान केंद्रांवरील वेबकास्टींगची पहाणी करणार आहेत हे वेबकास्टींग सुरुळीतपणे सुरु राहील याची दक्षता घ्यावी. सीव्हीजलवर येणाऱ्या तक्रारींवर तात्काळ प्रतिसाद द्यावा. मतदान केंद्रांवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना असे प्रशिक्षण द्या की त्यांच्यात एक आत्मविश्वास निर्माण झाला पाहिजे, असे सांगून निवडणुका निपक्षपातीपणे व पारदर्शक होण्यावर भर द्यावा, असे निर्देशही विभागीय आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांनी दिले.
जिल्हाधिकारी श्री. डुडी यांनी निवडणुकीच्या अनुषंगाने आढावा दिला. यावेळी ते म्हणाले, जिल्ह्यातील 50 टक्क्यांहून अधिक मतदान केंद्रांचे वेबकास्टींग करण्यात येणार आहे. सर्व मतदान केंद्रांवर पिण्याचे पाणी, बसण्यासाठी खुर्च्या, आरोग्य कीटची व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी ग्रामीण भागातील महिला बचत गटांचा सहभाग घेण्यात येणार आहे. 50 कुटुंबामागे एक महिलेची नियुक्ती करण्यात येणार आहे. या महिला सकाळी 7 वाजता दुपारी 1 वाजता व 4 वाजता कुटुंबांना भेटी देवून मतदान केले आहे किंवा कसे पाहून मतदान करण्याविषयी आवाहन करणार आहेत. 100 पेक्षा जास्त मतदान केंद्रे विविध थिमवर उभारण्यात येणार आहेत. निवडणुकीच्या अनुषंगाने 95 तक्रारी प्राप्त झाल्या होत्या त्यावर कार्यवाही करण्यात आली आहे, असेही जिल्हाधिकारी श्री. डुडी यांनी बैठकीत सांगितले.
पोलीस विभागाचा आढावा देताना पोलीस अधीक्षक श्री. शेख म्हणाले आतापर्यंत साडेनऊ कोटी इतकी रक्कम जप्त केली आहे. त्याचबरोबर अवैध दारु, गुटाखाही जप्त करण्यात आला आहे. यापुढे पोलीस विभागाकडून आणखीन गस्त वाढवून मोठ्या प्रमाणात कारवाया करणार असल्याचेही त्यांनी बैठकीत सांगितले.
०००