खर्च निरीक्षकांकडून नांदेड जिल्ह्यातील आढावा – महासंवाद
नांदेड दि. २३ : नांदेड जिल्ह्यातील विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी आलेले खर्च निरीक्षक ए. गोविंदराज व मयंक पांडे मंगळवार 22 ऑक्टोबरला दाखल झाले आहेत. त्यांनी 23 रोजी जिल्ह्यातील विविध विभाग प्रमुखांच्या बैठकी घेतल्या तसेच सी-व्हिजील कक्ष, निवडणूक खर्च कक्ष, माध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रण समिती कक्ष (एमसीएमसी) कक्षाला त्यांनी भेट दिली.
यावेळी त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल, महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. महेश डोईफोडे, अप्पर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजकुमार माने, महानगरपालिकेचे मुख्यालेखा अधिकारी डॉ. जनार्दन पक्वाने यांच्यासह विविध विभाग प्रमुख उपस्थित होते.
आज सर्वप्रथम खर्च निरीक्षक ए. गोविंदराज व मयंक पांडे यांनी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची त्यांच्या कक्षामध्ये भेट घेतली.त्यानंतर अप्पर जिल्हाधिकारी कक्षामध्ये जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत स्थिरनिगरानी पथक तसेच भरारी पथकाच्या गेल्या काही दिवसातील कार्याचा आढावा घेतला. यावेळी विधानसभा निवडणुकीसाठी केवळ 40 लक्ष रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. त्यामुळे उमेदवारांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवण्याचे स्पष्ट केले. जाहीर कार्यक्रम, सभा, याबाबत रॅलीचे संपूर्ण रेकॉड्रींग झाले पाहिजे. व्हिडिओग्राफरने अतिशय व्यावसायिकपणे चित्रीकरण केले पाहिजे. तपासणी दरम्यान सगळ्या गाड्यांचे नंबर, साहित्याचा तपशील कॅमेऱ्यात कसा येईल याबाबत त्यांनी सूचना केल्या.
सिव्हिल कक्षाला त्यांनी भेट दिली कक्षाचे नोडल अधिकारी गंगाधर इरलोड यांनी त्यांचे स्वागत केले. आचारसंहितेपासून झालेल्या कामकाजाचा आढावा दिला.
त्यानंतर त्यांनी निवडणुकीच्या खर्चावर नियंत्रण ठेवणाऱ्या खर्च समितीच्या कार्यालयाला भेट दिली. निवडणूक खर्चा संदर्भात नोडल अधिकारी असणारे डॉ जनार्दन पक्वाने यांनी यावेळी कक्षाच्या संदर्भात माहिती दिली. एमसीएमसी समितीच्या कक्षाला यावेळी त्यांनी भेट दिली. जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके यांनी त्यांचे स्वागत केले.
जाहिरातीवरील खर्च उमेदवाराचा मुख्य खर्च असून सर्व वर्तमानपत्रे, समाज माध्यम, बल्क एसएमएस संदेश तसेच सोशल माध्यमावरील पोस्ट या सर्व बाबींची माहिती खर्च निरीक्षकांना नियमितपणे कळली पाहिजे. यासाठी एमसीएमसी समितीने तत्पर रहावे. तसेच पेडन्यूजचा प्रकार होत तर नाही ना याकडे लक्ष वेधावे, असे यावेळी सांगितले.
०००