निवडणूक प्रक्रिया नि:पक्षपातीपणे पार पडण्यासाठी सर्व विभागांनी योग्य खबरदारी घ्यावी -केंद्रीय निवडणूक निरीक्षक – महासंवाद

0 3

निवडणूक प्रक्रिया नि:पक्षपातीपणे पार पडण्यासाठी सर्व विभागांनी योग्य खबरदारी घ्यावी -केंद्रीय निवडणूक निरीक्षक – महासंवाद

ठाणे, दि. २३ (जिमाका): महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले असून विधानसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया येत्या दि. 20 नोव्हेंबर 2024 रोजी होत आहे. ठाणे जिल्ह्यात 134  भिवंडी (ग्रामीण), 135 शहापूर, 136 भिवंडी (पश्चिम), 137 भिवंडी (पूर्व), 138 कल्याण (पश्चिम), 139 मुरबाड, 140 अंबरनाथ, 141 उल्हासनगर, 142 कल्याण (पूर्व), 143 डोबिवली, 144 कल्याण (ग्रामीण), 145 मीरा-भाईंदर, 146 ओवळा माजिवडा, 147 कोपरी-पाचपाखाडी, 148 ठाणे, 149 मुंब्रा-कळवा, 150 ऐरोली, 151 बेलापूर या ‍विधानसभा मतदारसंघातील निवडणुकांसाठी सर्व यंत्रणांनी निवडणूक प्रक्रिया शांततेत व नि:पक्षपातीपणे पार पाडण्यासाठी आपल्यावर सोपविण्यात आलेली जबाबदारी गांभिर्यपूर्वक पार पाडण्याचे निर्देश विधानसभा मतदारसंघात दाखल झालेल्या केंद्रीय खर्च निवडणूक निरीक्षकांनी आज झालेल्या बैठकीत दिले.

जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. अशोक शिनगारे यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा नियोजन भवन मधील समिती सभागृहात आयोजित बैठकीत निवडणूक प्रक्रियेच्या अनुषंगाने आज निवडणूक निरीक्षकांनी आढावा घेतला.

या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, पोलीस अधीक्षक डॉ.डी.स्वामी, अपर जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख, दीपक क्षीरसागर, सर्व विधानसभा मतदारसंघातील निवडणूक खर्च नियंत्रण समितीचे नोडल अधिकारी, विविध खात्यांचे अधिकारी, पोलीस अधिकारी आदी उपस्थित होते.

या बैठकीस 134 ते 138 ‍विधानसभा मतदारसंघासाठीचे केंद्रीय खर्च निरीक्षक श्री.रविंदर सिंधू (आयआरएस), 144 ते 147 विधानसभा मतदारसंघासाठीचे केंद्रीय खर्च निरीक्षक श्री.सुरेंद्र पाल सिंग (आयआरएस) (C&CP), 139 ते 143  विधानसभा मतदारसंघासाठीचे केंद्रीय खर्च निरीक्षक श्री.आशिषकुमार पांडे, 148 ते 151 विधानसभा मतदारसंघासाठीचे केंदीय खर्च निरीक्षक श्री.जी. मनिगंडास्वामी (आयआरएस)‍ उपस्थित होते.

विधानसभा सार्वत्रिक निवडणुका नि:पक्षपातीपणे, शांततेत व भारत निवडणूक आयोगाने आखून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार आदर्श आचारसंहितेचे पालन करुन यशस्वीपणे पार पाडण्यासाठी आपापसात उत्तम समन्वय साधावा. त्यासाठी मतदान प्रक्रियेत सहभागी असलेल्या सर्वांनी भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनांचा बारकाईने अभ्यास करावा, असे निर्देश केंद्रीय निवडणूक निरीक्षकांनी यावेळी दिले.

विधानसभा मतदारसंघात संवेदनशील असलेल्या मतदान केंद्रांवर लक्ष केंद्रीत करुन कायदा व सुव्यवस्थेबाबत योग्य ती खबरदारी घेण्यात यावी. आदर्श आचारसंहिता भंग होणार नाही, याची आचारसंहिता कक्षाने गांभीर्याने काळजी घ्यावी. मतदारसंघात पुरेशा प्रमाणात व्हिडिओ रेकॉर्डिंग टीम असतील व ते संपूर्ण प्रक्रियेवर बारकाईने लक्ष ठेवतील, यासाठी सूक्ष्म निरीक्षकांनी दक्ष राहावे. व्हिडिओ सर्व्हेलन्स टीमने स्टार कॅम्पेनअरचे संपूर्ण भाषण रेकॉर्ड करून ठेवावे. तसेच रॅली, प्रचारामध्ये विहीत परवानगी घेतलेली वाहनेच असतील. विनापरवाने वाहने आढळल्यास त्यांच्यावर तातडीने कारवाई करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले.

पेड न्यूजचे प्रकार घडू नयेत यासाठी दररोजची वर्तमानपत्रे, टिव्ही चॅनेल, सोशल मीडिया, आकाशवाणी केंद्र याद्वारे प्रसारित होणाऱ्या बातम्यांवर लक्ष ठेवावे, असेही त्यांनी नमूद केले. तसेच आतापर्यंत पेड न्यूजचे प्रकार घडले आहेत का याबद्दलची माहिती त्यांनी जाणून घेतली.

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी निवडणूक आयोगाने राष्ट्रीयकृत बँका, को-ऑपरेटिव्ह बँका व खाजगी बँकांकडून होणाऱ्या मोठ्या व्यवहारांसाठी देण्यात आलेल्या क्यू-आर कोडच्या माध्यमातून झालेल्या आर्थिक व्यवहाराबाबत केलेल्या कारवाईची माहिती घेतली. तसेच सी-व्हिजिल ॲपच्या माध्यमातून आलेल्या तक्रारींची माहिती घेवून कशा पध्दतीने कारवाई केली जात आहे, याबाबतही निरीक्षकांनी जाणून घेतले.

रेल्वेच्या माध्यमातून देखील मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर कॅशची ने-आण होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे नमूद करीत ठाणे रेल्वे स्टेशनवर पोलीस विभागाच्या माध्यमातून आरपीएफची नेमणूक करण्यात आली असल्याचे आरपीएफच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. रेल्वेच्या माध्यमातून होणाऱ्या बेकायदेशीर सर्व बाबींची दैनंदिन नोंद ठेवून बारीक लक्ष ठेवावे, अशा सूचनाही केंद्रीय खर्च निरीक्षक श्री.सुरेंद्र पाल सिंग (आयआरएस) यांनी दिल्या. तसेच विधानसभा मतदारक्षेत्रात गडद काळ्या रंगाच्या काचा असलेल्या गाड्यांची तपासणी करावी, या माध्यमातून गैरव्यवहार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा गाडया आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देशही या बैठकीत देण्यात आले.

उमेदवारांना 40 लाखांची खर्चाची मर्यादा ठेवण्यात आली आहे, त्यावर देखील खर्च विभागाने दैनंदिन लक्ष ठेवावे, निवडणूक कालावधीत जिल्ह्यात होत असलेली मद्यविक्री यावर देखील बारकाईने लक्ष ठेवावे, गरज पडल्यास याकामी मनुष्यबळ वाढविण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या.

०००

 

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.