जलसंधारणांच्या कामांना गती द्यावी; प्रत्यक्ष पाहणीतून गुणवत्ता तपासणार – पालकमंत्री अनिल पाटील
नंदुरबार,दि. २९ (जिमाका) : जिल्ह्यातील विविध जलसंधारणाच्या कामांना प्रशासकीय मान्यतेसह निधी वितरित करण्यात आला आहे, परंतु या कामांना गतीने पूर्ण करण्याची गरज असून कामांची गुणवत्ता तपासण्यासाठी कुठल्याही कामांना प्रत्यक्ष भेट देऊन शहानिशा केली जाईल, अशी माहिती मदत, पुनर्वसन व आपत्ती नियोजन मंत्री तथा पालकमंत्री अनिल पाटील यांनी दिली.
आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील मृद व जलसंधारणांच्या कामांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी मनीषा खत्री, सहाय्यक जिल्हाधिकारी मंदार पत्की (तळोदा) विनायक महामुनी (नंदुरबार), जिल्हा मृद व जलसंधारण अधिकारी र. सो. खोडे व विविध विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते.
यावेळी जलयुक्त शिवार अभियान 2.0, गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार कामांचा आढावा घेताना ते म्हणाले की, जिल्ह्यात अनेक ठिकाणी दुष्काळ आणि टंचाईची परिस्थिती आहे. येणाऱ्या काळात अशा परिस्थितीचा सामना करण्यासाठी जिल्ह्यात मृद व जससंधारणांच्या कामाला गती देवून ती वेळेत पूर्ण करणे गरजेचे आहे. या कामांना पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. हा निधी वेळेत खर्च करण्याबरोबरच कामांची गुणवत्ता राखण्याची जबाबदारी प्रशासकीय यंत्रणांची आहे. कामकाजात कुचराई व दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई केली जाईल.
०००