आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडण्यासाठी जिल्हा क्रीडा संकुलमध्ये दर्जेदार सुविधा द्याव्यात – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे
सांगली, दि. 28 (जि. मा. का.) : जिल्हा क्रीडा संकुलमधून भविष्यात राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू निर्माण व्हावेत, यासाठी जिल्हा क्रीडा संकुलमध्ये अधिकाधिक दर्जेदार सुविधा निर्माण करून द्याव्यात, अशा सूचना कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आज दिल्या.
शासकीय विश्रामगृह मिरज येथे आयोजित जिल्हा क्रीडा संकुल समितीच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, महानगरपालिका आयुक्त सुनील पवार, अतिरीक्त पोलीस अधीक्षक रितू खोकर, क्रीडा उपसंचालक माणिक पाटील, तहसीलदार अपर्णा मोरे-धुमाळ, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता क्रांतीकुमार मिरजकर, जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर, तालुका क्रीडा अधिकारी आरती हळींगळी, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) मोहन गायकवाड आदि उपस्थित होते.
राज्यातील, देशातील मान्यताप्राप्त क्रीडा संकुल अशी ओळख निर्माण होण्यासाठी जिल्हा क्रीडा संकुलामध्ये दर्जेदार क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज विषद करून पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले, यासाठी विहित पद्धतीचा अवलंब करून सूक्ष्म आराखडा तयार करावा. तसा प्रस्ताव व अंदाजपत्रक लवकरात लवकर सादर करावे. क्रीडा मंत्री यांच्याकडे पाठपुरावा करून, निधीची कोणत्याही प्रकारे कमतरता भासू दिली जाणार नाही. असे क्रीडा संकुल निर्माण झाल्यानंतर जिल्ह्यातील खेळाडुंचा क्रीडा विकास होईल, असे ते म्हणाले. तसेच, प्राप्त निधीचा विनियोग चांगल्या पद्धतीने करून खेळाडुंना अधिकाधिक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या.
या बैठकीत जिल्हा क्रीडा संकुल सांगली येथे वाढीव क्रीडा सुविधा, 400 मी. धावन मार्ग सिंथेटिक करणे, बॅडमिंटन हॉल अद्ययावत करणे, जलतरण तलाव दुरूस्तीस निधी, कबड्डी, खो-खो खेळासाठी डोम तयार करणे, व्यायामशाळा करणे व त्यासाठी व्यायाम साहित्य खरेदी करणे, वास्तूविशारद पॅनेल मार्फत जिल्हा व तालुका क्रीडा संकुलांचे बांधकाम करण्यासाठी अंदाजपत्रके व आराखडे तयार करून घेण्यास मान्यता मिळणे यासह अन्य कामांबाबत चर्चा करण्यात आली. तसेच, सांगली मिरज रस्त्यावरील मुख्य रस्त्यावरून जिल्हा क्रीडा संकुलपर्यंत जाणाऱ्या रस्त्याचे काम करण्याबाबतही चर्चा करण्यात आली.
किरण बोरवडेकर व आरती हळींगळी यांनी सादरीकरण करून आतापर्यंतच्या कार्यवाहीची व आगामी नियोजनाची माहिती दिली.
000