‘दिलखुलास’ कार्यक्रमात महिला व बालविकास अधिकारी महेंद्र गायकवाड यांची दि. २०, २१ व २२ डिसेंबरला मुलाखत
मुंबई, दि. १९: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ठाणे जिल्ह्याचे महिला व बालविकास अधिकारी महेंद्र गायकवाड यांची मुलाखत प्रसारित होणार आहे.
राज्यशासनामार्फत रस्त्यावर फिरणाऱ्या व वास्तव्य करणाऱ्या मुलांना संरक्षण देण्याबरोबरच त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यात महिला व बालविकास विभागामार्फत विविध उपक्रम व योजना राबविण्यात येत आहेत. यामध्ये बालस्नेही बस, फिरते पथक शाळा, सखी वन स्टॉप सेंटर, हिरकणी कक्ष आणि जिल्ह्यातील बालविवाह रोखण्यासाठी राबविण्यात आलेली विशेष मोहीम यांची अंमलबजावणी याबाबत महिला व बालविकास अधिकारी श्री. गायकवाड यांनी ‘दिलखुलास’ कार्यक्रमात माहिती दिली आहे. निवेदिका शिबानी जोशी यांनी ही मुलाखत घेतली आहे.
‘दिलखुलास’ कार्यक्रमात श्री. गायकवाड यांची मुलाखत बुधवार दि. २०, गुरुवार दि.२१, आणि शुक्रवार दि. २२ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ७:२५ ते ७:४० या वेळेत आकाशवाणीची सर्व केंद्र व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे.
०००
जयश्री कोल्हे/स.सं