साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या नाविन्यपूर्ण योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन
मुंबई, दि.१५ : सर्वसामान्यांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे महामंडळाने नाविन्यपूर्ण योजना सुरु केल्या आहेत. यात एन.एस.एफ.डी.सी.योजना, थेट कर्ज योजना, बीज भांडवल योजना, शिष्यवृत्ती योजना, थेट कर्ज योजना आदी नाविन्यपूर्ण योजना राबविल्या जात आहेत. या योजनांसाठी पात्र व्यक्तींनी पुढे येऊन लाभ घ्यावा. तसेच महामंडळाच्या शैक्षणिक कर्ज योजनेसाठी इच्छूकांनी प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाचे मुंबई शहर व उपनगर जिल्हा व्यवस्थापक अंगद कांबळे यांनी केले आहे.
या महामंडळाच्या भागभांडवलात वाढ होऊन महामंडळाचे भागभांडवल एक हजार कोटी झाले आहे. महामंडळामार्फत सुरु करण्यात आलेल्या नाविन्यपूर्ण योजना अशा आहेत.
एन.एस.एफ.डी.सी.योजना :- (राष्ट्रीय अनुसूचित जाती जमाती विकास महामंडळ नवी दिल्ली)- या मंडळामार्फत मुदत कर्ज प्रकल्प मर्यादा 5 लाख रुपये, महिला समृध्दी योजना प्रकल्प रक्कम 4 लाख 40 हजार रुपये, लघुऋण योजना प्रकल्प रक्कम 1 लाख 40 हजार रुपये या तीन योजनेसाठी 3 हजार 500 लाभार्थीकरिता 100 कोटी रुपये निधी मागणीचे प्रस्ताव एन.एस.एफ.डी.सी. महामंडळास मान्यतेसाठी सादर केलेले आहे.
मातंग समाजाच्या युवक,युवतीसाठी देशांतर्गत शिक्षणासाठी रु.30 लाख व परदेशांतर्गत शिक्षणासाठी रु.40 लाख कर्ज देण्याकरीताचे प्रस्ताव या महामंडळाच्या जिल्हा कार्यालयाकडून मागविलेले असून पात्र असलेल्या प्रस्तावास एन.एस.एफ.डी.सी. च्या निधीमधूनच मंजुरी देवून विद्यार्थ्यास शैक्षणिक कर्ज योजने अंतर्गत निधी उपलब्ध करुन दिला जाणार आहे.
थेट कर्ज योजना :- प्रकल्प मर्यादा 1 लाख रुपये या योजनेंतर्गत सन 2022- 23 या आर्थिक वर्षात 1 हजार 207 लाभार्थ्यांना 12 कोटीचे कर्ज मंजूर केले असून नोव्हेंबर अखेर 800 लाभार्थ्यांना 8 कोटी रुपयाचे वाटप केले आहे. तसेच 2023-24 या आर्थिक वर्षामध्ये भौतिक 1650 व आर्थिक 16 कोटी 50 लक्ष ची तरतूद केलेली असून कर्ज मंजूरीची कार्यवाही चालू आहे.
बीजभांडवल योजना :- या योजनेची प्रकल्प मर्यादा 7 लाख रुपये असून यामध्ये महामंडळामार्फत 10 हजार रुपये अनुदानासह 20 टक्के रक्कम हिस्सा महामंडळामार्फत दिला जात होता परंतु, लहुजी साळवे आयोग अभ्यास गटाच्या 19 मंजुर शिफारशी पैकी क्र.1 च्या शिफारशीच्या अनुषंगाने या योजनेमध्ये महामंडळाचा हिस्सा 20 टक्के वरुन 45 टक्के करण्यात आला आहे. ही रक्कम 4 टक्के व्याजाने दिली जाते, लाभार्थीचा सहभाग 5 टक्के असुन उर्वरीत 50 टक्के बँकेचे कर्ज असते. महामंडळाच्या हिशाची रक्कम 20 टक्के वरुन वाढवुन 45 टक्के केल्यामुळे बँकाकडून कर्ज मंजुरी करीता वाढता प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे बहुसंख्य अर्जदारांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महामंडळामार्फत करण्यात येत आहे.
शिष्यवृत्ती योजना : मातंग समाजातील विद्यार्थ्यांकरीता लोकशाहीर अण्णा भाऊ साठे प्रोत्साहनपर शिष्यवृत्ती योजना राबविली जाते. त्यामध्ये प्रतिवर्षी इयत्ता 10 वी, 12 वी, व पदवीमध्ये 60 टक्के पेक्षा जास्त गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना 10 वी साठी 1 हजार, 12 वी साठी 1 हजार 500 रुपये देण्यात येत होते. तथापि संचालक मंडळाच्या मान्यतेने चालू आर्थिक वर्षापासून यामध्ये भरघोस वाढ करण्यात आली असून इयत्ता 10 वी साठी 5 हजार, 12 वी साठी 7 हजार 500 व पदवी व पदविकासाठी 10 हजार तर पदव्युत्तरसाठी 12 हजार 500 रुपये इतकी भरघोस वाढ करण्यात आली आहे.
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या धर्तीवर 30 लाख प्रकल्प मर्यादा असलेल्या व व्याज परतावा योजना या महामंडळास लागू करण्याबाबत शासनाकडे प्रस्ताव मान्यतेसाठी सादर करण्यात येत आहे.
थेट कर्ज योजना :- सध्या महामंडळामार्फत 1 लाख रुपये प्रकल्प मर्यादा असलेली थेट कर्ज योजना राबविण्यात येते परंतु या रक्कमेमध्ये मोठे व्यवसाय करणे शक्य होत नसल्यामुळे योजनेची प्रकल्प मर्यादा 5 लाख पर्यंत करण्याकरीता मागणी होत होती. त्याअनुषंगाने या योजनेची प्रकल्प मर्यादा 5 लाख पर्यंत वाढविण्याचा प्रस्ताव शासनास सादर केलेला असून राज्यशासनाकडुन याबाबतची मान्यता लवकरच मिळणार आहे.
लहुजी साळवे मातंग समाज आयोगाच्या शासनाने मंजूर केलेल्या 68 शिफारशी पैकी 19 शिफारशी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या संबंधित आहे. या 19 शिफारशीमध्ये दोन टप्पे करुन पहिल्या टप्यातील नऊ शिफारशीकरीता 234 कोटी व उर्वरीत 10 शिफारशीकरीता 221 कोटी असे एकूण 455 कोटी इतका निधी मिळणे करीताचा प्रस्ताव शासनास सादर केलेला आहे.
अंधेरी मुंबई तसेच उस्मानाबाद जिल्हयातील तुळजापूर येथील जागे बाबत- मुंबई अंधेरी येथे महामंडळाच्या मालकीची 384 चौ.मी. जागा असुन या जागेवर अण्ण्णाभाऊ साठे भवन व बहुउद्देशीय प्रशासकीय इमारत उभारण्याकरीता 50 कोटी रुपये तसेच जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांनी मातंग समाजाच्या युवक, युवतीसाठी विविध व्यवसायाचे प्रशिक्षण देण्याकरीता तुळजापूर नगरपालिका यांच्या मालकीची 1 एकर जागा या महामंडळास उपलब्ध करुन दिली आहे. या जागेवर सुसज्य प्रशिक्षण केंद्र उभारणीकरीता 50 कोटी रुपये निधी मिळणे करीताचा प्रस्ताव शासनास सादर केलेला आहे.
००००
शैलजा पाटील/विसंअ