जिल्ह्यात 18 ते 19 वयोगटातील मतदारांची नोंदणी वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत-विभागीय आयुक्त सौरभ राव

0 7

फॉर्म नंबर 6, 7 व 8 मधील प्रलंबित प्रकरणे 20 डिसेंबर 2023 पूर्वी निकाली काढावीत

सोलापूर, दि. 14(जिमाका):- जिल्ह्यात 18 ते 19 वयोगटातील तरुणांची मतदार म्हणून नोंदणी कमी दिसत आहे. या वयोगटातील तरुणांची मतदार म्हणून नोंदणी वाढवण्यासाठी सर्व उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांनी प्रयत्न करावेत. त्यासाठी जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयात मतदार नोंदणी शिबिरांचे आयोजन करावे, असे आवाहन विभागीय आयुक्त तथा मतदार नोंदणी निरीक्षक सौरभ राव यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रम अंतर्गत आढावा बैठकीत विभागीय आयुक्त श्री. राव मार्गदर्शन करत होते. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निऱ्हाळी, प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी गजानन गुरव, सदाशिव पडदुणे, अमित माळी, विठ्ठल उदमले, नामदेव टिळेकर, प्रियंका आंबेकर यांच्यासह सर्व  तहसीलदार उपस्थित होते.

विभागीय आयुक्त श्री. राव म्हणाले की, भारत निवडणूक आयोगाने मतदार यादीचा संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. सोलापूर जिल्ह्यात 36 लाखापेक्षा अधिक मतदार आहेत. यामध्ये 18 ते 19 वयोगटातील मतदारांची संख्या कमी दिसत असल्याने प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व महाविद्यालय व स्वयंसेवी संस्थांची मदत घेऊन या वयोगटातील तरुणांची मतदार म्हणून नोंदणी करावी. तसेच महाविद्यालयीन शिक्षण संपल्यानंतर या गटातील तरुण एमआयडीसी व अन्य उद्योगात तसेच आस्थापनामध्ये काम करत असण्याची शक्यता असल्याने त्याठिकाणी विशेष शिबिरे घेऊन त्यांची नोंदणी मतदार म्हणून करावी. या वयोगटातील एकही तरुण मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यापासून वंचित राहणार नाही याबाबत सर्वांनी दक्षता घ्यावी, असेही त्यांनी सूचित केले.

मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत फॉर्म नंबर 6 मतदार नाव नोंदणी फॉर्म, नंबर 7 मतदार यादीतून नाव वगळणे व फॉर्म नंबर 8 मतदार यादीतील नावात दुरुस्ती करणे या अनुषंगाने प्रलंबित असलेल्या 38 हजार 383 प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन ही सर्व प्रकरणे 20 डिसेंबर 2023 पूर्वी निकाली काढावीत. 5 जानेवारी 2024 रोजी मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याने उपरोक्त प्रकरणे निकाली काढण्यास प्राधान्य द्यावे, असे निर्देश विभागीय आयुक्त श्री. राव यांनी दिले.

मतदार नोंदणी व मतदार जागृतीसाठी प्रशासनामार्फत जिल्ह्यात जनजागृती केली जात आहे. तसेच नव मतदारांची नोंदणी वाढविण्यासाठी महाविद्यालयामध्ये मतदार नोंदणी शिबिरे घेण्यात येत आहेत. यात 18 ते 19 वयोगटातील मतदार नोंदणीसाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निऱ्हाळी यांनी दिली. तसेच फॉर्म नंबर 6 ची 15 हजार 538 प्रकरणे, फॉर्म नंबर 7 ची 17 हजार 854 व फॉर्म नंबर 8 ची 4 हजार 991 प्रकरणे प्रलंबित असून ती निकाली काढण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.

मतदार संख्या

सोलापूर जिल्ह्यात दोन लोकसभा व अकरा विधानसभा मतदार संघ असून 27 ऑक्टोंबर 2023  नुसार जिल्ह्यात 36 लाख 33 हजार 72 इतके मतदार असून यामध्ये 18 लाख 89 हजार 234 पुरुष, तर 17 लाख 43 हजार 579 स्त्री मतदार आणि इतर 259 मतदार आहेत. तर  3 हजार 599 मतदार केंद्र आहेत.

0000

 

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.