शाळांच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री रोखण्यासाठी भरारी पथके- मंत्री धर्मराव बाबा आत्राम
शाळांच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री रोखण्यासाठी भरारी पथके– मंत्री धर्मराव बाबा आत्राम
नागपूर, दि. १३ : राज्यातील शाळांच्या १०० मीटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थाची विक्री करण्यास शासनाने मनाई आदेश लागू केला आहे. शाळांच्या १०० मीटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थाची विक्री रोखण्यासाठी भरारी पथके निर्माण करण्यात येणार असल्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी विधानपरिषदेत सांगितले.
राज्यातील शाळांच्या १०० मीटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीसंदर्भात सदस्य विक्रम काळे यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना मंत्री श्री. आत्राम बोलत होते.
मंत्री श्री. आत्राम म्हणाले की, राज्यातील शालेय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेच्या आवारात तंबाखूजन्य पदार्थ मिळू नये म्हणून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर जरब बसविण्यासठी राज्यातील संबंधित यंत्रणा व पालकांची एक संयुक्त बैठक घेऊन कडक कायदा करण्यात येणार आहे. वेळप्रसंगी ‘मोक्का’ लावण्यासाठी प्रयत्न केला जाईल.
अन्न व औषध प्रशासन विभागाने गेल्या वर्षभरात या पदार्थाची विक्री करणाऱ्या टपऱ्यांविरोधात मोठ्या प्रमाणात कारवाई केली आहे. ही कारवाई सतत सुरू आहे. शाळांमधील विद्यार्थी नकळत व्यसनाकडे ओढला जाऊ नये, यासाठी विद्यार्थ्यांचे पालक, शिक्षण संस्थांचे मुख्याध्यापक, शाळा कृती समितीचे पदाधिकारी यांना अधिक दक्ष राहण्याच्या सूचना देण्यात येणार आहेत. केंद्र सरकार यासंदर्भात कायदा करीत असून, तो अंतिम टप्प्यात आहे. तो कायदा अस्तित्वात आल्यानंतर तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर नियंत्रण येणार आहे. अन्न आणि औषध प्रशासन विभागात मनुष्यबळ वाढवित येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी सदस्य सर्वश्री सुरेश धस, शशिकांत शिंदे, महादेव जानकर, सचिन अहिर, भाई जगताप, नरेंद्र दराडे, रामदास अंबटकर, अमोल मिटकरी यांनी सहभाग घेतला.
0000
राजू धोत्रे/विसंअ/