‘महापुरुषांचे कौशल्य विचार’ पुस्तक प्रकाशन आणि स्वर्गीय दत्ताजी डिडोळकर पुरस्कार वितरण सोहळ्याचे राजभवन नागपूर येथे १२ डिसेंबरला आयोजन :  मंत्री मंगल प्रभात लोढा

0 4

मुंबई,दि.10 : कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत ‘महापुरुषांचे कौशल्य विचार’ या पुस्तकाचे प्रकाशन आणि स्वर्गीय दत्ताजी डिडोळकर सन्मान पुरस्कार वितरण सोहळ्याचे नागपूर येथे 12 डिसेंबर रोजी सायंकाळी  5.00 वाजता राजभवन नागपूर येथे  आयोजन केले आहे. राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली.

मंत्री श्री.लोढा म्हणाले की, महाराष्ट्र हा आपल्या महापुरुषांच्या कर्तृत्वाने, प्रेरणेने आणि विचारान  समृध्द आहे. छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर,महात्मा जोतीराव फुले, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक,स्वातंत्र्यवीर विनायक सावरकर या महापुरुषांच्या कौशल्य विषयक अप्रतिम ध्येय धोरणाची ओळख व महात्म्य आजच्या विशेषत: कौशल्य शिक्षण घेणाऱ्या तरुण पिढीला होणे गरजेचे आहे.या महापुरुषांनी आपल्या काळात समाज जीवनामध्ये कौशल्य विकासाचे तत्त्व यशस्वीपणे अंगिकारले होते.”महापुरुषांचे कौशल्य विचार” या पुस्तकात महापुरुषांच्या कौशल्य विषयक कार्याचा, धोरणाचा व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रमांमध्ये समावेश केल्यामुळे व्यवसाय शिक्षण अधिक समृद्ध होऊन विद्यार्थ्याचे कौशल्य  वाढण्यासही मदत होणार आहे. आयटीआयच्या सद्यस्थितीतील अभ्यासक्रमाव्यतिरिक्त “महापुरुषांचे कौशल्य विचार” हा विषय विद्यार्थ्यांना शिकविला जाणार आहे. संचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय स्तरावर गठीत समितीने तयार केलेल्या या माहितीपूर्ण पुस्तिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते होणार  आहे असेही मंत्री श्री. लोढा म्हणाले.

मंत्री श्री. लोढा म्हणाले की, बहुआयामी व्यक्तीमत्व स्वर्गीय दत्ताजी डिडोळकर यांच्या नावाने  शैक्षणिक, सामाजिक आणि कौशल्य विकास क्षेत्रात भरीव योगदान देणा-या व्यक्तींना स्वर्गीय दत्ताजी डिडोळकर सन्मान  पुरस्कार देवून गौरव करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाला स्थानिक लोकप्रतिनिधी, कौशल्य, रोजगार,उद्योजकता व नाविन्यता विभागाचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह,महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीचे आयुक्त डॉ.रामास्वामी एन, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक दिगांबर दळवी, कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू अपूर्वा पालकर,कौशल्य विकास,  रोजगार व उद्योजकता आयुक्तालय, नवी मुंबईचे उप आयुक्त दि.दे.पवार यासह आणि अधिकारी उपस्थित राहणार आहेत तरी या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत करण्यात आले आहे.

०००००

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.