‘क्रेडाई अमरावती ग्रॅण्ड प्रॉपर्टी एक्स्पो’ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट

0 3

अमरावती, दि. 9 (जिमाका) :  क्रेडाई अमरावतीमार्फत जिल्ह्यात ‘ग्रॅण्ड प्रॉपर्टी एक्स्पो 2023’ चे आयोजन करण्यात आले. या प्रॉपर्टी एक्सपोला आज उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी भेट दिली. जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासाठी प्रलंबित असलेली कामे नागपूर अधिवेशन कालावधीत मार्गी लावू, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी यावेळी दिली.

सायन्स स्कोर मैदान येथे ‘ग्रॅण्ड प्रॉपर्टी एक्स्पो 2023’ ला सुरुवात झाली असून ते दि. 11 डिसेंबरपर्यंत चालणार आहे.  आमदार प्रविण पोटे पाटील, आमदार सुलभा खोडके, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा, मनपा आयुक्त देविदास पवार, क्रेडाई अमरावतीचे अध्यक्ष निलेश ठाकरे, उपाध्यक्ष कपिल आडे, सचिव रवींद्र गोरटे आदी यावेळी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले की, प्रत्येकाला घर मिळावे, यासाठी केंद्र व राज्य सरकार प्रयत्नशील आहे. म्हाडाच्या माध्यमातून राज्यात अनेक प्रकल्प सुरु असून गरजूंना त्यांच्या स्वप्नातील घरे उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. बांधकाम व्यावसायिकांनी पुढाकार घेऊन स्वस्त व चांगल्या दर्जाच्या सुविधायुक्त घरे  ग्राहकांना  उपलब्ध करुन द्यावीत. बांधकाम व्यावसायिकांसाठी शासनामार्फत अनेक योजना व सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहे. यामुळे बांधकाम क्षेत्रात अनेक नव्या संधी निर्माण झाल्या आहेत.  जिल्ह्यात अनेक प्रलंबित समस्या आहेत. त्या मार्गी लावण्यासाठी नागपूर अधिवेशन कालावधीत बैठक घेवून अधिवेशन संपण्यापूर्वी ते मार्गी लावू. बऱ्याच वर्षापासून प्रलंबित असलेली ‘गटार योजना’ पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन देवू. तसेच जिल्ह्यातील डिपीआर संदर्भातील समस्या, घर व भाडे इमारतीवरील वाढीव दराने लावलेले कर या संदर्भात आढावा घेवून ते कमी करण्यासाठी प्रयत्न करण्याबाबत आश्वस्त केले.

अमरावतीचा विस्तार वेगाने होत असल्याने या ठिकाणी मुलभूत सुविधेसोबतच विमान सेवा असणे आवश्यक आहे. बेलोरा विमानतळ सुरु होण्यासाठी येणाऱ्या अडचणी तातडीने मार्गी लावून नाईट लँडींग व इतर सुविधा तयार करुन विमानसेवा लवकरच सुरु करण्यासाठी प्रयत्न करण्याचेही ते यावेळी म्हणाले. रेरा संदर्भातील येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी मंत्रालयस्तरावर बैठक घेवून त्यावर मार्ग काढण्यात येईल.  जिल्ह्यातील प्रलंबित समस्या मार्गी लावण्यासाठी लोकप्रतिनिधी व प्रशासनाने पुढाकार घेवून अधिवेशन कालावधीत बैठक घेण्याचे आवाहन केले. जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी निधी उपलब्ध करुन देण्याची ग्वाही  श्री. पवार यांनी यावेळी दिली.

कार्यक्रमाच्या सुरुवातील प्रॉपर्टी एक्स्पोमध्ये लावण्यात आलेल्या स्टॉल्सला श्री. पवार यांनी भेटी देऊन  ग्राहकांना देण्यात येणाऱ्या सुविधा तसेच त्यांना येणाऱ्या अडचणींविषयी जाणून घेतले. ग्राहकांच्या स्वप्नातील घर तयार करण्यासाठी आवश्यक असणारी माहिती प्रॉपर्टी एक्सपोच्या माध्यमातून एकाच ठिकाणी उपलब्ध करुन देण्यात आली असून नागरिकांनी त्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी केले.

आमदार प्रविण पोटे पाटील व आमदार सुलभा खोडके यांनी जिल्ह्यातील गटार योजना, डिपीआर, बेलोरा विमानतळ, घर व इमारतीवरील कर अशा विविध समस्याबाबत माहिती देऊन त्या मार्गी लावण्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी उपमुख्यमंत्री श्री. पवार यांना केली.

ग्रॅण्ड प्रॉपर्टी एक्स्पोचा शुभारंभ दि. 8 डिसेंबर रोजी झाला. हा एक्सपो 11 डिसेंबरपर्यंत चालणार असून सकाळी 10 ते रात्री 8 वाजेपर्यंत सुरु राहणार आहे. या एक्सपामध्ये 60 पेक्षा अधिक स्टॅाल्स ग्राहकांसाठी उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. यामध्ये प्लॉटपासून ते बांधकाम साहित्य, बंगला, रो-हाऊस, फ्लॅट, दुकाने व गृह कर्ज देणाऱ्या बँक यांचा समावेश आहे. या एक्सपोच्या माध्यमातून बांधकाम संदर्भातील नवीन तंत्रज्ञान व माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

00000

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.