अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शासनाकडे पाठपुरावा करणार – मंत्री डॉ. विजयकुमार गावितअवकाळीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शासनाकडे पाठपुरावा करणार – मंत्री डॉ. विजयकुमार गावित – महासंवाद
नुकसान कमी करण्यासाठी प्रक्रिया उद्योगांसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणार
नंदुरबार, दि. ५ (जिमाका): अवकाळी पावसाने जिल्ह्यातील शेतपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी शासनाकडे व मंत्रिमंडळ बैठकीत पाठपुरावा करणार असल्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी सांगितले. अवकाळी पाऊस, वादळ, अतिवृष्टी, चक्रीवादळ यामुळे होणारे शेतपिकांचे व शेतकऱ्यांचे नुकसान कमी करण्यासाठी प्रक्रिया उद्योगांसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणार असल्याचेही मंत्री डॉ. गावित म्हणाले.
शहादा तालुक्यातील अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या हिंगणी, कोंढावळ, तोरखेडा, उभादगड, काकरदा, खापरखेडा, दिगर, वडाळी या गावांतील शेतकऱ्यांच्या शेतावर आदिवासी विकास मंत्री डॉ. गावित यांनी भेट दिली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या कृषी सभापती हेमलता शितोळे, प्रांताधिकारी सुभाष दळवी, उपविभागीय कषी अधिकारी तानाजी खर्डे, तहसिलदार दिपक गिरासे, तालुका कृषी तालुका अधिकारी काशिराम वसावे, सामाजिक कार्यकर्ते डॉ. कांतीलाल टाटीया व पंचक्रोशीतील ग्रामपंचायतींमधील सरपंच, पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.
मंत्री डॉ. गावित म्हणाले की, गेल्या आठवड्यात ३० व ३१ नोव्हेंबर रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिसकावून घेतला आहे. जिल्हा प्रशासनाने केलेल्या सर्व्हे नुसार १६० शेतकऱ्यांच्या १५० हेक्टरवरील शेतपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यात प्रामुख्याने पपई व केळी या नगदी फळ पिकांचा समावेश आहे. लवकरात लवकर नुकसानीचे पंचनामे पूर्ण करून भरपाई देण्याबाबकचा अहवाल जलद गतीने शासनास सादर करण्याबरोबरच एकही नुकसानग्रस्त शेतकरी भरपाईपासून वंचित राहणार नाही, याबाबत खबरदारी घेण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना करण्यात आल्या आहेत.
ज्यांनी शासनाच्या पीकविमा योजनेत सहभाग घेतला त्यांना नियामनुसार भरपाई मिळेलच, परंतु ज्यांनी पीकविमा घेतला नाही त्यांचीही शासनाकडून भरपाईची अपेक्षा आहे. प्रत्येक क्षणी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याची शासनाची भुमिका असून, वारंवार अवकाळी, वादळी पाऊस तसेच अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान पाहता केंद्र सरकार व राज्य शासनाच्या कृषी प्रकिया उद्योग योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कृषी प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी प्रोत्साहन व आर्थिक मदत करण्यासाठी येणाऱ्या काळात प्रयत्न केले जातील. त्यामुळे नुकसान होणाऱ्या शेतमालावर नुकसान झाल्याबरोबर काही प्रक्रिया करून होणारे नुकसान कमी करता येईल. शेतकऱ्यांनी खचून न जाता धैर्याने या परिस्थितीचा सामना करावा, शासनाकडून त्यांना सर्वतोपरी मदत केली जाईल,अशी ग्वाहीही यावेळी मंत्री डॉ. गावित यांनी शेतकऱ्यांना दिली.
०००