ग्रामपंचायत निवडणुकांचा खर्च पारंपरिक पद्धतीने सादर करता येणार
मुंबई, दि. 1 (रानिआ) : ग्रामपंचायत निवडणुकांतील सर्व उमेदवार ट्रू व्होटर ॲपबरोबरच आता पारंपरिक पद्धतीनेदेखील (ऑफलाइन) निवडणूक खर्चाचा हिशेब सादर करू शकतात, असे राज्य निवडणूक आयोगाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
विविध जिल्ह्यांमधील ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व पोटनिवडणुकांसाठी 5 नोव्हेंबर 2023 रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. या निवडणुकांचा निकाल 6 नोव्हेंबर 2023 रोजी जाहीर करण्यात आला. त्यामुळे बिनविरोध विजयी झालेल्यांसह निवडणूक लढविलेल्या सर्व उमेदवारांनी 6 डिसेंबर 2023 पर्यंत निवडणूक खर्चाचा हिशेब सादर करणे आवश्यक आहे. नक्षलग्रस्त/ दुर्गम भागात मात्र 7 नोव्हेंबर 2023 रोजी निकाल जाहीर करण्यात आला. त्यामुळे तेथील बिनविरोध विजयी झालेल्यांसह निवडणूक लढविलेल्या सर्व उमेदवारांनी 7 डिसेंबर 2023 पर्यंत निवडणूक खर्च सादर करणे आवश्यक आहे.
सर्व उमेदवारांना ट्रू व्होटर ॲपद्वारे निवडणूक खर्च सादर करणे बंधनकारक करण्यात आले होते; परंतु त्यात तांत्रिक अडचणी येत असल्याचे अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडून प्राप्त झाले होते. त्यामुळे आता ज्यांना ट्रू व्होटर ॲपद्वारे निवडणूक दाखल करणे शक्य नाही, त्यांना पारंपरिक (ऑफलाइन) पद्धतीने देखील निवडणूक खर्चाचा हिशोब सादर करता येईल, असेही राज्य निवडणूक आयोगाच्या प्रसिद्धिपत्रकात नमूद केले आहे.
०-०-०