महाबळेश्वरमधील बॉम्बे पॉईंट येथील स्टॉलधारकांची भाडेदरवाढ ५ टक्केच करावी यासाठी पाठपुरावा करणार – पालकमंत्री शंभुराज देसाई
सातारा दि. 1 (जिमाका) : सातारा वनविभागात महाबळेश्वर हे प्रसिध्द थंड हवेचे पर्यटनस्थळ आहे. या ठिकाणी देश-विदेशाचे अनेक पर्यटक भेटी देत असतात. बॉम्बे पाँईंट या स्थानकावर सांयकाळच्यावेळी सूर्यास्त पाहण्यासाठी पर्यटकांची फार मोठ्या प्रमाणावर गर्दी असतेच. या ठिकाणी असणाऱ्या स्टॉल धारकांकडून सन 2011-2012 पासून प्रतिवर्षी 20 टक्के भाडेवाढ धोरणानुसार स्टॉल भाडे वसूल करण्यात येते. ही भाडेवाढ 20 टक्के ऐवजी 5 टक्के करावी अशी मागणी स्टॉलधारकांकडून करण्यात येत असून तसा प्रस्ताव शासनासा सादर करण्यात आला आहे. या प्रस्तावाच्या मंजुरीसाठी आपण स्वत: जातीने लक्ष घालून पाठपुरावा करु अशी ग्वाही पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालय सातारा येथे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी या विषयाबाबत झालेल्या बैठकीस जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी , मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलिस अधिक्षक समीर शेख, उपवनसंरक्षक आदिती भारद्वाज, सार्वजनिक बांधकाम विभागाचे संतोष रोकडे, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, सहायक वनसंरक्षक महेश झांजूरने, महाबळेश्वरचे आर.एफ.ओ गणेश महांगडे, यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते.
महाबळेश्वर येथील बॉम्बे पॉईंट धारकांना 20 टक्के भाडेवाढीच्या धोरणानुसार स्टॉलभाडे उभारणी करण्यास शासनाने मे 2012 च्या पत्रानुसार मंजुरी दिली आहे. त्यानुसार संबंधीत स्टॉलधारकांकडून प्रतिदिवस स्टॉलभाडे वसुल करण्यात येत आहे. स्टॉलधारकांनी सन 2019-20 अखेर स्टॉल भाडे भरणा केला आहे. तथापि तद्नंतर सन 2021-22 पासून संबंधित स्टॉल धारकांनी स्टॉलभाडे भरणा केला नाही. ही दरवाढ कमी करावी ती 20 टक्क्यावरुन 5 टक्के करावी. अशी मागणी सदर स्टॉलधारकांनी केली आहे. याबाबतचा प्रस्तावा शासनास सादर करण्यात आला असून तो मंत्रालय स्तराव आहे. या प्रस्तावास लवकरात लवकर मंजुरी मिळावी यासाठी आपण स्वत: जातीने लक्ष घालून मार्गी लावू अशी ग्वाही पालकमंत्री यांनी यावेळी दिली.
000