प्रत्येक वंचितास शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ उपयुक्त ठरणार – केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील
ठाणे, दि.30 (जिमाका) :- केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ वंचित राहिलेल्यांना त्यांच्या घराजवळच मिळावा, यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ सुरु केली आहे. प्रत्येक वंचितास शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ उपयुक्त ठरेल, असे प्रतिपादन केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी आज भिवंडी येथे केले.
‘विकसित भारत संकल्प यात्रा’ या उपक्रमाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी दूरदृश्यप्रणालीद्वारे लाभार्थ्यांशी संवाद साधत असताना केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील भिवंडी तालुक्यातील सावरोली ग्रामपंचायत, घोटगाव येथील एज्यू स्मार्ट डिजिटल स्कूल या ठिकाणी उपस्थित होते, त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रुपाली सातपुते, भिवंडी प्रांताधिकारी अमित सानप, उप मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे, तहसिलदार अधिक पाटील, जिल्हा परिषदेचे महिला व बालविकास अधिकारी संजय बागुल, गटविकास अधिकारी प्रदीप घोरपडे, स्थानिक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, इतर विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी, बचतगटाच्या महिला, शालेय विद्यार्थी व लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
केंद्रीय राज्यमंत्री श्री.पाटील म्हणाले की, केंद्र सरकारच्या योजना प्रत्येक गावातील गरजू नागरिकापर्यंत पोहोचविण्यासाठी हा संकल्प आहे. निश्चितपणाने यामधून केंद्र व राज्य सरकारच्या सर्व योजनांचा लाभ गावातील प्रत्येक गरजू नागरिकांना मिळेल. या उपक्रमाला नागरिकांकडूनही उत्कृष्ट प्रतिसाद मिळत आहे. सरकारी योजनांचा लाभ अधिकाधिक लोकांनी घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
या कार्यक्रमानिमित्त विकसित भारत संकल्प यात्रेंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना, आयुष्मान भारत, उज्ज्वला योजना अशा विविध योजनांच्या माध्यमातून लाभार्थ्यांना झालेल्या लाभाबाबत माहिती देण्यात आली. त्यानंतर लाभार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते आयुष्मान भारत गोल्ड कार्ड व जलजीवन मिशनचे प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. यावेळी कार्यक्रमस्थळी आरोग्य तपासणीसह विविध विभागांच्या योजनांची माहिती देणारे स्टॉल्स लावण्यात आले होते. नागरिकांनी या स्टॉल्सला भेटी देऊन आरोग्य तपासणीसह विविध योजनांचा लाभ घेतला. यावेळी सर्वांना मा.पंतप्रधान श्री. मोदी यांचा विकसित भारत बनविण्याचा संकल्प संदेश ऐकविण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी संकल्प शपथ घेतली.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्यप्रणालीव्दारे केंद्र शासनाच्या विविध योजनाचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांशी संवाद साधून योजनांच्या लाभाविषयी अनुभव जाणून घेतले. योजनांची माहिती प्रत्येक वंचित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन प्रधानमंत्री श्री.मोदी यांनी यावेळी केले. फ्लॅगशिप योजनांचा लाभ लक्षित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रा संपूर्ण देशात प्रचार व प्रसिद्धी करीत आहे. या यात्रेच्या माध्यमातून वंचित घटकांनी शासनाच्या योजनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रधानमंत्री यांनी केले.
0000000000