बचत गटांच्या उत्पादित मालाबरोबर शेतकऱ्यांच्या मालालाही मॉलमध्ये विक्रीसाठी ठेवण्यास जागा उपलब्ध करुन देणार – पालकमंत्री शंभूराज देसाई
सातारा, दि. 25 – नवी मुंबई, ठाणे, वाशी आदी ठिकाणी मोठमोठे मॉल आहेत. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री पद माझ्याकडेच असल्यामुळे सातारा जिल्ह्यातील महिला बचत गटांना सवलतीच्या दरात स्टॉल उपलब्ध करून देण्याचा निर्णय ठाणे जिल्हा परिषद प्रशासनाने घेतला आहे. त्यामध्ये सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची उत्पादनेही ठेवण्यात येतील, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी दिली.
कराड येथील शेती उत्पन्न्न बाजार समितीच्या आवारात भरविण्यात आलेल्या आठराव्या राज्यस्तरीय स्वर्गीय यशवंतराव चव्हाण कृषी, औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शनाचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याहस्ते उद्घाटन झाले. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, आमदार पृथ्वीराज चव्हाण, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख, रयत साखर कारखानाचे अध्यक्ष अॅड.उदयसिंह पाटील, शेती उत्पन्न बाजार समिती कराडचे सभापती विजय कदम, उपसभापती संभाजीराव चव्हाण, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे, धैर्यशील कदम, चंद्रकांत जाधव यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती.
पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, शेतकऱ्यांना नवतंत्रज्ञान पाहाता, अनुभवता यावे. या संकल्पनेतून स्वर्गीय विलासकाका उंडाळकर यांनी कृषी, औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शनाची संकल्पना साकारली. आज या प्रदर्शनात अनेक स्टॉल उभारले गेले आहेत. या माध्यमातून शेतकऱ्यांना कृषी क्षेत्रातील नवनवीन बदल, वैविध्यपूर्ण उपक्रम, नवनवीन तंत्रज्ञान यांची माहिती सहज उपलब्ध करून देण्यात येत आहे. शेतकऱ्यांच्या जीवनात विकासाच्या, परिवर्तनाच्या दृष्टीने हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे.
शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांच्या उत्पादित मालाला योग्य कृषी भाव देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी अनेक वेगवेगळ्या योजना राबविण्यात येत आहेत. कृषी विभागाला अधिक गतिमानता शासन देत असून शेतकऱ्यांच्या बांधावर कृषी यंत्रणेला पाठविण्यात येत आहे. त्याद्वारे शेतकऱ्यांना प्रात्यक्षिकातून प्रशिक्षण देण्यात येत आहे. जेथे पाण्याची कमतरता आहे, तेथे बांबू लागवड केल्यास शाश्वत उत्पादन मिळू शकते. त्यासाठी जिल्ह्यात बांबू लागवडीला प्रोत्साहन देण्यात येत असल्याचेही पालकमंत्री श्री. देसाई यांनी सांगितले.
पश्चिम महाराष्ट्र हा सहकाराची पंढरी म्हणून ओळखला जातो. सहकार क्षेत्राला राज्यात आणि देशात दिशा देण्याचे काम या भागाने केले आहे, असे सांगून पालकमंत्री शंभूराजे देसाई म्हणाले, कराड येथील शेती उत्पन्न बाजार समिती ही सहकाराच्या माध्यमातून अत्यंत चांगले काम करीत आहे. सभासद, शेतकरी, संस्था यांचे हित डोळ्यासमोर ठेवून काम केल्यास शेतकऱ्यांचे सहकाराच्या माध्यमातून फार मोठे हित आपण साधू शकतो. सहकारात काम करत असताना गट – तट बाजूला ठेवून काम करा. आणि विश्वासार्हता जपा. सभासदांच्या हिताचे रक्षण करताना जर सहकारी संस्था कमी पडत असेल, कोणी गैर व्यवहार करत असेल तर त्यांच्यावर शासन कारवाई करण्यासही कचरणार नाही. तशी वेळ सहकारी संस्थांनी येऊ देऊ नये.
प्रदर्शनाबद्दल बोलताना श्री. देसाई म्हणाले, कृषी औद्योगिक आणि पशुपक्षी प्रदर्शनाच्या माध्यमातून कराड बाजार समितीने अतिशय चांगले दालन उपलब्ध करून दिले आहे. या माध्यमातून काम करत असताना शेतकऱ्यांचे जे प्रश्न असतील ते आपण मांडावेत शासन निश्चितपणे ते सोडवेल.
यावेळी बोलताना खासदार श्रीनिवास पाटील म्हणाले, आज शेतात माल पिकत आहे, पण विकायला जागा नाही ग्रामीण भागात जे उत्पादन होते ते गुणवत्तेच्या जोरावर शहरी बाजारपेठेत चांगल्या दराने विकले गेले पाहिजे, अशी व्यवस्था निर्माण होणे आवश्यक आहे.
आमदार पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, कराड येथे होत असलेले राज्यस्तरीय कृषी औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शनाचा लाभ साधारणपणे आठ ते दहा लाख शेतकरी बांधव घेत असतात. या वर्षीही शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर या प्रदर्शनाचा लाभ घेऊन नवतंत्रज्ञान आत्मसात करण्याचा प्रयत्न करावा व शाश्वत शेतीसाठी प्रयत्नरत राहावे. कृषी उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्याचा प्रयत्न होत असतानाच खाद्यपदार्थांची गुणवत्ता, त्याचे पॅकेजिंग, ब्रँडिंग आणि त्याचा टिकाऊपणा यासाठी शास्त्रशुद्ध प्रशिक्षण शेतकऱ्यांना देणे आवश्यक आहे. कृषी माफी योजनेतून जे शेतकरी वंचित राहिले आहेत, प्रोत्साहन अनुदान योजनेतून अद्यापही जे शेतकरी वंचित आहेत आशांना शासनाने लवकरात लवकर लाभ द्यावा, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. हवामान बदलामुळे पाण्याची कमतरता जाणवत आहे. हे वर्ष पाण्याच्या उपलब्धतेच्या दृष्टीने अत्यंत बिकट व गंभीर ठरू शकते. त्यामुळे चारा छावण्या, टँकरची उपलब्धता यासाठी प्रशासकीय यंत्रणेने आत्तापासूनच नियोजन करावे. वनतलावांचे नूतनीकरण करावे. वनतलावांशी संबंधित जे प्रस्ताव प्रलंबित आहेत त्यांना यंत्रणांनी त्वरित मान्यता द्यावी, वनतलावांच्या दुरुस्तीमुळे त्याखालील गावांना पाणी उपलब्ध होऊ शकते.
या कार्यक्रमात कृषी उत्पादनात उत्तम कामगिरी करणार्या शेतकर्यांचा पालकमंत्री उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी प्रास्ताविक सभापती विजय कदम यांनी केले, तर आभार संचालक प्रकाश पाटील यांनी मानले. कार्यक्रमास शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
0000