सहकार महर्षी सुधाकर पंत परिचारक यांच्या सहकार क्षेत्रातील भरीव योगदानमुळे सर्वसामान्यांची प्रगती – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस
पंढरपूर दिनांक 22:- सहकार क्षेत्रातील ऋषितुल्य व्यक्तिमत्व असलेले कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक यांनी तळागाळातील सर्वसामान्य लोकांसाठी काम केलेले होते. सहकार क्षेत्रातील त्यांच्या भरीव योगदानामुळेच या भागातील सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक प्रगती झालेली आहे असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखाना च्या प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले, त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील, सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा. तानाजी सावंत, आमदार सर्वश्री राजेंद्र राऊत ,समाधान आवताडे, राम सातपुते, सचिन कल्याण शेट्टी, माजी मंत्री विजय देशमुख, माजी आमदार प्रशांत परिचारक, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्यासह कारखान्याचे संचालक मंडळ व सभासद उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री फडवणीस म्हणाले, सहकार महर्षी सुधाकर पंत परिचारक यांनी सहकार उद्योग मोठा केला असून त्यांच्याकडे समाजाभिमुख नेतृत्व होते. त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मला मिळाली हे आमचं भाग्य आहे असे गौरवउद्गारही त्यांनी काढले. त्यांनी या भागात सहकार क्षेत्रातून केलेल्या कामामुळे अनेक लोकांची आर्थिक प्रगती झालेली आहे. सर्व सामान्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक यांनी सहकार क्षेत्राचा अत्यंत चांगल्या पद्धतीने वापर केला असे त्यांनी सांगितले.
पांडुरंग सहकारी साखर कारखाना वाखरी पासून 30 किलोमीटर अंतरावर आहे. सभासदांची गैरसोय लक्षात घेता सभासदांना कारखान्याच्या सुविधा मेळाव्यात यासाठी वाखरी येथे प्रशासकीय इमारत बांधण्यात आली आहे, अशी माहिती माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी दिली.
प्रारंभी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या हस्ते फीत कापून कारखान्याच्या प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन करण्यात आले.
0000