मुख्यमंत्र्यांची केंद्रीय नगरविकास मंत्र्यासोबत दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून बैठक

0 6

मुंबई, दि. 16 : मुंबईतील क्षेपणभूमीवरील (डंपिंग ग्राऊंड) साठलेल्या कचऱ्याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी समिती नेमून आठवडाभरात त्याचा  कृती आराखडा सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. मुंबईतील मुलुंड, कांजुरमार्ग आणि देवनार या क्षेपणभूमीवरील हजारो टन कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जलदगतीने विल्हेवाट लावली जावी, क्षेपणभूमीवरील कचऱ्याचे ढीग हटवावेत, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

यासंदर्भात केंद्रीय नगर विकास आणि नागरी सुविधा मंत्री हरदीप सिंह पुरी यांच्यासोबत दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून बैठक झाली.  त्यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते.

वर्षा निवासस्थानी झालेल्या या बैठकीला मुख्य सचिव मनोज सौनिक, महापालिका आयुक्त आय. एस. चहल, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव के. एच. गोविंदराज, महानगरपालिका अतिरीक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे उपस्थित होते. केंद्रीय नगर विकास आणि नागरी सुविधा विभागाचे सचिव मनोज जोशी दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते.

मुंबईतील वाढत्या प्रदूषणाची पातळी कमी करायची असल्यास शहरातील घनकचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्याची गरज आहे. केंद्रीय नगरविकास मंत्रालयाच्या वतीने सद्य स्थितीत अस्तित्वास असलेल्या कचऱ्याचे जलदगतीने विघटन करण्यासाठी उपलब्ध असलेल्या पर्यायांचे सादरीकरण यावेळी करण्यात आले.

मुंबई महानगरपालिकेच्या वतीने गेल्या काही वर्षात या घनकचऱ्यापासून खत निर्मिती, वीज निर्मिती करणारे प्रकल्प सुरू करण्यात आले आहे. कांजुरमार्ग येथील वीज निर्मिती प्रकल्पासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून प्रकल्प राबविण्यात यावा, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे मुंबईत उपलब्ध असणाऱ्या खारभूमीचा देखील पर्यावरणाची हानी होणार नाही याची दक्षता घेऊन सार्वजनिक कामाकरीता वापर करता येईल याबाबीकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधले.

स्वच्छ भारत मोहिमेंतर्गत महानगरांमधील स्वच्छतेसोबतच क्षेपणभूमीवरील साठलेल्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याच्या मोहिमेला गती देऊन ही मोहिम यशस्वी करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.

००००

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.