मराठा कुणबी जातीचे पुरावे तपासणीचे काम मिशन मोडवर करावे – अपर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण
धुळे, दिनांक 5 नोव्हेंबर, 2023 (जिमाका वृत्त); मराठवाड्यात कुणबी नोंदी शोधण्यासाठी जी मोहीम राबविण्यात आली त्याच धर्तीवर आता संपूर्ण राज्यभर ही प्रक्रिया मिशन मोडवर राबविण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विभागीय आयुक्त आणि सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. या पार्श्वभूमीवर धुळे जिल्ह्यात सर्व विभागांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील मराठा- कुणबी नोंदी शोधण्याचे काम मोहिमस्तरावर करावेत. अशा सूचना जिल्हास्तरीय समितीचे अध्यक्ष तथा अपर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण यांनी संबंधित यंत्रणांना दिल्या आहेत.
मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा जातीच्या नोंदी तपासण्यासाठी गठीत धुळे जिल्हास्तर व सर्व तालुकास्तरीय समितीची बैठक आज जिल्हास्तरीय समितीचे अध्यक्ष तथा अपर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण यांच्या अध्यक्षतेखाली दुरदृष्यप्रणालीव्दारे संपन्न झाली. बैठकीस धुळे महापालिका आयुक्त अमिता दगडे-पाटील, राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक मनोज शेवरे, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे, उपविभागीय अधिकारी राहुल जाधव, प्रमोद भामरे, रविंद्र शेळके, जिल्हा जात पडताळणी समितीचे उपायुक्त राकेश महाजन, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) मोहन देसले, यांच्यासह जिल्ह्यातील सर्व तहसिलदार, सर्व नगरपालिकांचे मुख्याधिकारी आदी उपस्थित होते.
यावेळी अपर जिल्हाधिकारी श्री. केकाण म्हणाले की, मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने धुळे जिल्ह्यात सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील मराठा-कुणबी नोंदी शोधण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली असून यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली “विशेष कक्ष” स्थापन करण्यात आला आहे. मराठा- कुणबी जातींच्या जुन्या नोंदी, अभिलेख, दस्ताऐवज, खरेदी खत, सातबारा उतारे, जुने गुन्हे दाखल नोंदी, कारागृहात अटक झालेल्या गुन्हेगाराच्या जुन्या नोंदी तसेच इतर माहिती संकलीत करण्यासाठी सर्व विभागांनी मोहिमस्तरावर काम करावे, महसुल विभाग, शिक्षण विभाग, नगरपालिका, महानगरपालिका, राज्य उत्पादन शुल्क विभाग, पोलीस विभाग, जिल्हा कारागृह, भुमी अभिलेख विभाग, जिल्हा उपनिबंधक विभागांनी त्यांच्याकडे असलेल्या 1967 पुर्वीच्या जुन्या नोंदी तपासून ते स्कॅन करुन तालुकास्तरावरुन जिल्हास्तरावर सादर करावेत. या जुन्या नोंदी शोधण्यासाठी सर्व विभागाने आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करुन द्यावेत. तसेच उपविभागीय अधिकारी तसेच जात पडताळणी कार्यालयाने गेल्या पाच वर्षांत दिलेल्या कुणबी मराठा जात प्रमाणपत्राची माहिती संकलीत करावी. यासाठी सर्व जिल्हाप्रमुखांनी तालुकास्तरावर बैठकीचे आयोजन करावे. तालुकास्तरावर विशेष कक्षाची स्थापना करावी. जुने रेकॉर्ड व्यवस्थित हाताळणी करुन ते योग्यरित्या स्कॅन करुन दैनंदिन कामाचे विहित नमुन्यातील विवरणपत्र, माहिती सादर करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्यात.
निवासी उपजिल्हाधिकारी श्री. गावंडे म्हणाले की, मराठा आरक्षण देण्यासाठी नाशिक विभागीय आयुक्त राधकृष्ण गमे यांनी विभागातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात यासंदर्भात स्वतंत्र कक्ष स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत. यापार्श्वभूमीवर धुळे जिल्ह्यात सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील मराठा- कुणबी नोंदी शोधण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली असून यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात “विशेष कक्ष” स्थापन करण्यात आला आहे. शासन निर्णय 31 ऑक्टोंबर, 2023 मध्ये निर्देश दिल्याप्रमाणे तालुकास्तरावर विविध शासकीय विभागातील 1967 पुर्वीच्या कागदपत्रांची पडताळणी, तपासणी करावी. त्यात कुणबी कागदपत्रे आढळल्यास त्याचे स्कॅनिंग करुन जतन करुन तपासलेले कागदपत्रे व आढळलेल्या नोंदी यांची माहिती दैनंदिन स्वरुपात प्राप्त करुन जिल्ह्याच्या संकेतस्थळावर अद्ययावत करण्यासाठी सादर करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्यात.
अशी आहे जिल्हास्तरीय समिती
धुळे जिल्ह्यात अपर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण यांच्या अध्यक्षतेखाली विशेष कक्ष स्थापन करण्यात आला असून निवासी उपजिल्हाधिकारी हे या समितीचे सदस्य सचिव आहेत. तर जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत), शिक्षणाधिकारी (प्राथमिक), शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जिल्हा सहआयुक्त, नगरपालिका, जिल्हाधिकारी कार्यालय हे सदस्य असणार आहे.
0000000