राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांची जिल्हा क्रीडा संकुलाला भेट देऊन पाहणी
बारामती, दि.29: बारामती येथील जिल्हा क्रीडा संकुल राज्यासाठी आदर्शवत असून राज्यात या क्रीडा संकुलाला मॉडेल मानून अन्यत्र संकुलाची कामे करण्याचा मानस असल्याचे प्रतिपादन राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी केले.
क्रीडामंत्री श्री. बनसोडे यांनी शुक्रवारी सायंकाळी जिल्हा क्रीडा संकुलातील विविध प्रशिक्षण केंद्रास भेट देऊन प्रशिक्षक व खेळाडूंसोबत संवाद साधला. खेळाडूंसाठी असणाऱ्या सोई सुविधा, स्वच्छता पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले.
श्री. बनसोडे यांनी शासनाच्यावतीने खेळाडूंसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनाची माहिती दिली. खेळाडूंना येणाऱ्या अडीअडचणी सोडवण्यासाठी राज्य शासन सोबत असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
यावेळी त्यांच्या हस्ते संकुलातील विविध प्रशिक्षण केंद्रावरील राज्य व राष्ट्रीय पदक विजेत्या खेळाडूंचा सत्कार केला. तसेच क्रीडा संकुलातील प्रशासकीय बाबी चांगल्या पद्धतीने हाताळल्याबद्दल प्रशासनाचे कौतुक केले.
यावेळी उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे खासगी सचिव हनुमंत पाटील, तहसीलदार गणेश शिंदे, तालुका क्रीडा अधिकारी महेश चावले, पोलीस निरीक्षक दिनेश तायडे, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक संभाजी होळकर, माजी उपनगराध्यक्ष जय पाटील, नवनाथ बल्लाळ आदी उपस्थित होते.
0000