ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. बाबा महाराज सातारकर यांच्या पार्थिवावर हजारोंच्या उपस्थितीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
ठाणे, दि.27(जिमाका) :- ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. बाबामहाराज सातारकर यांच्या पार्थिवावर आज नेरुळमधील सारसोळे गावातील शांतीधाम वैकुंठ स्मशानभूमीत आज सायंकाळी शासकीय इतमामात हजारो वारकरी भक्तांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आला. यावेळी स्व.ह.भ.प.बाबामहाराज यांचे नातू ह.भ.प चिन्मय महाराज सातारकर यांनी पार्थिवाला मुखाग्नी दिला.
याप्रसंगी स्व. ह.भ.प. बाबामहाराज यांच्या मोठ्या भगिनी माई महाराज, मुलगी ह.भ.प. भगवती ताई महाराज सातारकर, रासेश्वरी सोनकर, नातू ह.भ.प. चिन्मय महाराज सातारकर हे उपस्थित होते.
यावेळी विठ्ठल रुक्मिणी मंदिरात नवी मुंबई पोलीस दलाच्या वतीने मानवंदना देण्यात आली. जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी शासनाच्या वतीने पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली. सायंकाळी शांतीधाम स्मशानभूमीत पोलिसांनी बंदुकीच्या फैरी झाडून तर पोलीस बँड पथकाने धून वाजवून मानवंदना दिली.
यावेळी खासदार राजन विचारे, आमदार निरंजन डावखरे, आमदार शशिकांत शिंदे, ह.भ.प.नामदेव शास्त्री महाराज यांच्यासह जिल्हाधिकारी श्री.अशोक शिनगारे, नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त राजेश नार्वेकर, नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, सह पोलीस आयुक्त संजय मोहिते, उपविभागीय अधिकारी श्रीमती उर्मिला पाटील, नवी मुंबई महानगरपालिका उपायुक्त डॉ. राहुल गेठे, तहसिलदार युवराज बांगर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून श्रद्धांजली वाहिली.
000